गेल्या शुक्रवारी चर्चा होती ती 'सायकल'ची. पिवळी धमक सायकल सगळीकडे दिसत होती. प्रकाश कुंटेच्या या सिनेमात एकापेक्षा एक कलाकार आहेत. प्रियदर्शन जाधव आहे. ह्रषिकेश जोशी आहे आणि भाऊ कदमही आहे. अहो खरंच आहे. तुम्ही सिनेमा नाही का पाहिला? हां.. तरीच. सिनेमात भाऊ आहे हे कळायला सिनेमा पाहावा लागतो.

तुम्ही या सिनेमाचं फक्त प्रमोशन पाहात असाल, तर मात्र त्यात भाऊ आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही. कारण आपले भाऊसाहेब सायकलच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कुठेच नव्हते. सगळीकडे आपले प्रकाशराव, ह्रषिकेश जोशी आणि प्रियदर्शन. खरंतर यात प्रियदर्शनच्या बरोबरीने भाऊचा रोल आहे. पण हा इसम कुठे दिसेना. बरं.. भाऊ कुठे बाहेर गावीच गेलाय का.. तर तसंही नाही. तिकडे 'चला हवा येऊ द्या'च्या प्रमोशनमध्ये दिसला की पठ्ठ्या. झी वाल्यांनी 'हॅम्लेट' आणि 'अलबत्त्या गलबत्या' या नाटकाचं प्रमोशन 'चला हवा..'मध्ये केलं तेव्हा भाऊ होता. अरेच्चा.. मग भाऊराव तिकडे आहेत मग इकडे का नाही?

काय येतंय का लक्षात..  देवा.. 'सायकल' वायकॉम 18 वाल्यांचा सिनेमा आहे नं आणि भाऊ 'चला हवा...'च्या निमित्ताने झीची प्रॉपर्टी होऊन बसला आहे. खास खात्रीलायक माहितीनुसार भाऊने 'सायकल'वर बसूच नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली गेली. नव्हे.. तसं सज्जड दम देण्यात आला..

बाबो.. म्हणजे कलर्स व्हर्सेस झीच्या या युद्धात आता कलाकारांचा आणि त्यांनी केलेल्या कलाकृतीचा बळी जाणार का काय? हा प्रकार इंडस्ट्रीत सगळीकडे पसरला आहे. कलाकारांची तर बोलती बंद झाली आहे. इकडे गेलं तर तिकडचे चिडतात...तिकडे गेलं तर इकडचे पाण्यात बघतात, असा प्रकार झाला आहे. अवघड आहे ब्वा.. आता कुणीही विचारुन नये हं.. चॅनल वॉर म्हणजे काय रे भाऊ?