पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदी बिजेंद्र पाल सिंग यांची निवड करण्यात आली आहे. बी. पी. सिंग हे प्रसिद्ध टीव्ही मालिका सीआयडीचे निर्माते आणि दिग्दर्शक होते. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

बिजेंद्र पाल सिंग हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी (1970-73) असून त्यांनी छायाचित्रणात विशेष कौशल्य प्राप्त केलं होतं. तसेच सध्या ते एफटीआयआयच्या शासकीय परिषदेचं उपाध्यक्षपद भूषवत होते. मार्च 2020 पर्यंत बी. पी. सिंग यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ असेल.

विक्रमवीर दिग्दर्शक

बी. पी. सिंग यांनी मनोरंजन विश्वाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ (21 वर्ष) चाललेल्या सीआयडी या विक्रमी टीव्ही मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. 2004 मध्ये बी. पी. सिंग यांचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलं होतं. 111 मिनिटांचा सलग शॉट (कुठेही कट किंवा रिटेक न घेता) चित्रित केल्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे.

ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला होता. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.

अनुपम खेर अध्यक्ष म्हणून फक्त तीन वेळा एफटीआयआयमध्ये आले होते, असं त्यांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांनी म्हटलं होतं. तसेच त्यांच्याशी पत्र व्यवहार केल्यास उत्तरं मिळायची नाहीत. विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे चेअरमन हे एफटीआयआयला भरपूर वेळ देणारे असावेत, अशी इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.