Megha Dhade: अभिनेत्री मेघा धाडेनं (Megha Dhade) काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये (Bharatiya Janata Party) प्रवेश केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मेघानं ही माहिती चाहत्यांना दिली होती. आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी मेघा धाडेची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नुकतीच याबाबत मेघानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मेघानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये चंद्रशेखरजी बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) आणि प्रियाताई बेर्डे (Priya Berde) हे दिसत आहेत. या फोटोला मेघानं कॅप्शन दिलं, 'भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश महामंत्री माननीय विजयजी चौधरी, माझी लाडकी सांस्कृतिक प्रकोष्ठची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा प्रियाताई बेर्डे यांच्या उपस्थितीत माझी महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माझ्याबरोबर अनेक कलाकारांचे पक्षप्रवेश करण्यात आले.मला प्रिया ताईनी जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडून अनेक कलाकारांना पक्षाशी जोडून जोमाने काम करीन. हा जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार.'
मेघानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर एक खास पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या.
अनेक कलाकार गेल्या काही दिवसांपासून राजकारणामध्ये एन्ट्री करताना दिसत आहेत. अभिनेता अभिजीत केळकरनं देखील भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. तसेच सौरभ गोखले यानं देखील काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.
मेघा धाडेला बिग बॉसमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मेघा ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनची विजेती ठरली. तसेच मेघानं अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं हिंदी बिग बॉसच्या 12 सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता.
इतर महत्वाच्या बातम्या:
Megha Dhade: 'बिग बॉस मराठी' फेम मेघा धाडेची राजकारणात एन्ट्री; भाजपामध्ये केला प्रवेश