अभिनेता पुष्कर जोगने स्त्री वेश धारण करुन बिग बॉस मराठीच्या घरात खळबळ उडवून दिली आहे. आपण बिकीनी घातल्यामुळे बातम्या होतील, अशी खात्री पुष्करला आहे. तर दुसरीकडे आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी भांडण उकरुन काढत बातमीदारांना खाद्य पुरवलं आहे.
या टास्कमध्ये मेघा धाडे कॅमेरामनच्या तर रेशम टिपणीस पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इतर स्पर्धक कसे बातम्या निर्माण करतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे. टास्कदरम्यान स्पर्धकांना आपण किती बातम्या निर्माण केल्या असतील, याची एक ते पाच अशी क्रमवारी लावायची आहे.
खरं तर सोमवारच्या भागात दाखवलेल्या प्रोमोमध्ये उषा आणि शर्मिष्ठा एकमेकींशी कचाकचा भांडताना दिसल्या. इतकंच नाही, तर आऊंनी शर्मिष्ठाच्या कानाखाली आवाज काढल्याचंही पाहायला मिळालं. बहुतांश प्रेक्षकांना हे खरोखरचं भांडण आहे की काय, असं वाटलं.
आता बिग बॉसच्या घरात काहीतरी चमचमीत पाहायला मिळणार, आऊंनी आपली तलवार अखेर म्यानातून काढली, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर उमटल्या. मात्र सारे काही टास्कसाठी असल्याचे दिसत आहे.
बिग बॉसच्या घरात आता नऊ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू हे नऊ स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.
मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सात स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत.
काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती.
या आठवड्यात रेशम कॅप्टन असल्यामुळे सेफ होती, तर नंदकिशोरला हुकूमशाहच्या टास्कमध्ये दिलेली कामं त्याने पूर्ण केल्यामुळे तोही सुरक्षित झाला. वाळूच्या टास्कमध्ये मेघा आणि पुष्करच्या जोडीने स्वतःला सेफ केल. आस्ताद, सई, उषा, स्मिता आणि शर्मिष्ठा हे पाच स्पर्धक यावेळी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.