खरं तर 'हिंदी बिग बॉस'मध्ये शो सुरु होतानाच बक्षिसाची रक्कम सांगितली जाते. मात्र मराठीच्या बाबतीत तसं घडलं नाही. अर्थात बिग बॉस मराठीचा विजेता मालामाल होणार एवढं मात्र नक्की. कारण नुकतीच बिग बॉसकडून एक घोषणा करण्यात आली.
'बिग बॉस मराठी'च्या विजेत्याला आलिशान घर बक्षिस म्हणून मिळणार आहे. मुंबईपासून थोडं दूर असलं तरी वन बीएचके फ्लॅटची किंमत किमान 20 लाख रुपये तरी असणारच ना.
साधारण 20 लाखांचं घर, प्रत्येक आठवड्यानुसार मिळणारं फिक्स मानधन आणि 'कलर्स मराठी'कडून देण्यात येणारी रोख रक्कम, हे सगळं मिळून बिग बॉस मराठीचा विजेता किमान 50 लाख रुपये घेऊन घरी जाणार यात शंका नाही.
बिग बॉसच्या घरात आता आठ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू, उषा नाडकर्णी हे दहा स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.
मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सहा स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत.
काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती.
मेघा, सई, नंदकिशोर, स्मिता आणि शर्मिष्ठा हे पाच स्पर्धक यावेळी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे येत्या रविवारी कोणता स्पर्धक घराबाहेर जाणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.