Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan :  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनला (Bigg Boss Marathi Season 5) आता रंग चढू लागला आहे. बिग बॉसचा तिसरा आठवडा सुरू झाला असून बहुतांशी सगळेच स्पर्धक आता आपला खेळ खेळू लागले आहेत. गुलिगत धोका म्हणून सोशल मीडियावर धुरळा उडवणाऱ्या सूरज चव्हाणने (Suraj Chavan) सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या सीझनमध्ये आक्रमक खेळणाऱ्या निक्की तांबोळी,  अरबाज पटेल, वैभव चव्हाण, जान्हवी किल्लेकर यांच्या ग्रुपला सूरजने चॅलेंज दिले आहे. 


मागील आठवड्यातील 'कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन' या टास्कमध्ये गुलिगत सूरज चव्हाण हा थेट वैभव चव्हाणलाच नडला होता. वैभवने त्याला धमकी दिली तरी सूरज चव्हाणने त्याला न घाबरता अरेरावीला उत्तर दिले. 'भाऊचा धक्का'वर रितेश देशमुखनेही सूरजचे कौतुक केले. सूरज आता आत्मविश्वासाने बिग बॉसच्या घरात वावरत असून आता ट्रॉफी मीच जिंकणार असे म्हणत आता आपणही स्पर्धेत असल्याचे म्हटले. 


सूरजने शड्डू ठोकला, चॅलेंज केलं...


गार्डन एरियामध्ये सूरज आणि अभिजीत चव्हाण गप्पा मारत असतात. त्यावेळी सूरज चव्हाण म्हणतो की, आता जोशात खेळणार. नडतो मी ह्यांना... असं नडतो ना, परत म्हणतील बारीक आहे पण लैय बेक्कार आहे असे म्हणतील. यावेळी सूरजचा रोख हा निक्की-अरबाजच्या ग्रुपवर असल्याचे म्हटले जाते. निक्की-अरबाज यांचा ग्रुप हा इतर सदस्यांवर अरेरावी करत असल्याचा आरोप नेटकरी करतात. 'भाऊचा धक्का'मध्येही होस्ट रितेश देशमुखने त्यांच्या ग्रुपची खरडपट्टीच काढली आहे. आता, सूरजनेच चॅलेंज केले आहे. 






शेवटी आलोय...शेवटी जाणार...ट्रॉफी मीच जिंकणार...


सूरज चव्हाणने शड्डू ठोकला असून बिग बॉस मराठीची ट्रॉफी मीच घेऊन जाणार असल्याचा निर्धार त्याने व्यक्त केला. गार्डन एरियामध्ये अभिजीत सावंत सोबत बोलताना सूरज चव्हाणने मीच जिंकणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले. 


अभिजीत सावंतसोबत बोलताना सूरजने म्हटले की, शेवटी ट्रॉफी मीच नेणार. ह्यांना कोणाला हात लावू देणार नाही. यावर अभिजीत सावंत त्याला, तूच ने, तुझा हक्कच आहे, असे म्हणत त्याचा आत्मविश्वास वाढवतो. तुला शेवटचा समजतात असे अभिजीतने म्हणताच, शेवटीच आलो आणि शेवटीच जाणार असे सूरजने सांगितले. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर खंडोबाला जाणार, पप्पांना  भेटणार, त्यानंतर आई मरिमाताकडे जाणार असे म्हणत ही इच्छा पूर्ण होऊ द्या असे सूरज हात जोडून प्रार्थना करतो.  तू ट्राफी जिंकलास की आम्हालाही आनंद होईल... तुझी इच्छा पूर्ण होऊ दे...असे अभिजीत सावंत म्हणतो.