Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli : 'बिग बॉस मराठी'च्या  (Bigg Boss Marathi Season 5) यंदाच्या सीझनमधील सहावा आठवडा आता पूर्ण होणार आहे. या आठवड्यातही टास्कमध्ये जोरदार राडा झाला. त्याशिवाय, इतर वेळीही घरातील सदस्यांमध्ये वादावादी झाली होती. घरातील सदस्यांना बिग बॉसने सरप्राईज देत रेन डान्स करण्यास सांगितले. या रेन डान्समध्ये घरातील सदस्य चांगलेच थिरकले. घरातील सदस्यांना आपल्या तालावर नाचवणारी निक्की तांबोळी (Nikki Tamboli) देखील थिरकली. 

'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्य भांडणाने त्रस्त झाले होते. त्यामुळे आज पावसाची सर त्यांना सुखावून जाणार आहे. बिग बॉसने खास आपल्या शैलीत घरातील सदस्यांना आज तुम्हाला पावसात भिजण्याचा आनंद देणार असल्याचे सांगितले. पंढरीनाथ कांबळी अर्थात पॅडीदादाशी संवाद साधताना बिग बॉस यांनी ज्येष्ठ लेखक व. पु. काळे आणि  सुप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅम्पिलन यांच्या पावसाबाबतच्या काही ओळी सांगितल्या. त्यानंतर घरातील सदस्यांना पावसात भिजण्याचा आनंद द्यायचा असल्याचे सांगितले. 

पंढरी शेवटचं पावसात कधी भिजलात? बिग बॉसचा पॅडी दादाला सवाल

'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात बिग बॉस पॅडी दादांना विचारत आहेत,"पंढरी शेवटचं पावसात कधी भिजला होतात?". त्यावर पॅडी म्हणतो,"खूप वर्ष झाली". बिग बॉस पुढे व. पू, काळेंचं एक वाक्य ऐकवतात,"पाऊस अनेक ठिकाणी एकाचवेळी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असतं". तसेच पावसावर चार्ली चॅप्लिन म्हणतात,"मला पावसात भिजायला आवडतं. कारण तेव्हा माझे अश्रू दिसत नाहीत". त्यानंतर बिग बॉस पुढे पावसात भिजता येण्याची व्यवस्था केली असल्याचं सदस्यांना सांगतात.

निक्कीचा भन्नाट डान्स...

'कोणी ढगाला लागली कळं'  तर 'कोणी टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर डान्स करताना दिसून येणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सर्व सदस्यांना नाचवणारी निक्की 'टिप टिप बरसा पानी' या गाण्यावर रेन डान्स करताना दिसणार आहे. निक्कीसोबत अरबाजदेखील तिचा डान्स एन्जॉय करताना दिसणार आहे. तर अभिजीत बिग बॉसला पुन्हा एकदा गाणं लावण्याची विनंती करताना दिसणार आहे. एकंदरीतच 'बिग बॉस मराठी'च्या घरात आज एक वेगळाच माहोल तयार होणार आहे.

गुलिगत सूरज चव्हाण झाला घराचा नवा कॅप्टन...

बिग बॉस मराठीच्या नवीन प्रोमो आऊट झाला असून यामध्ये कॅप्टन्सी कार्याची झलक पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसत आहे की, बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन होण्याचा मान सूरज चव्हाणला मिळाला आहे. कॅप्टन्सी कार्यात सूरज चव्हाणने झापुक झुपूक गेम करत बाजी मारली आणि तो आता बिग बॉस मराठीच्या घरातील नवीन कॅप्टन झाला आहे. यानंतर घरातील सदस्यांनी त्याचं अभिनंदन करत कौतुक केल्याचंही दिसत आहे.