Bigg Boss Marathi Season 5 Contestants Riteish Deshmukh : जवळपास दोन वर्षांपासून प्रेक्षकांना बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची (Bigg Boss Marathi Season 5) उत्सुकता लागली होती. नव्या रुपात, नव्या ढंगात बिग बॉस मराठीचा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. यंदाच्या सीझनचा होस्ट म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) दिसणार आहे. तर, दुसरीकडे यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या नावाची उत्सुकता वाढली आहे.  'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची चर्चा सुरू झाली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या संभाव्य स्पर्धकांच्या नावावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे.


कोणत्या कलाकारांच्या नावाची चर्चा?


बिग बॉसच्या घरात एन्ट्री करण्यांमध्ये अनेकांच्या नावाच्या चर्चा सुरु आहे. यामध्ये मराठी-हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नावाची चर्चा आहे.  अभिनेता विवेक सांगळे आणि चेतन वडनेरे हे दोघेही बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर ही देखील बिग बॉसच्या घरात जाऊ शकते असे म्हटले जात आहे. त्याशिवाय, एक गायक आणि एक प्रसिद्ध डान्सर-अभिनेत्रीदेखील बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.  






शोच्या होस्टिंगबाबत रितेशने काय सांगितले....


'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या सीझनसाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संवाद साधताना अभिनेता रितेश देशमुखने शोबद्दल भाष्य केले. रितेशने सांगितले की, मी स्वत: बिग बॉसचा फॅन आहे. माझा आवडता फॉरमॅट आहे. आता आपल्या आवडीच्या शोला  होस्ट करणे खूप उत्साहजनक असणार असल्याचे त्याने म्हटले. मी या शोचा चाहता असल्याने होस्टिंगच्या ऑफरला होकार दिला. बिग बॉसमध्ये येणे हा माझा सन्मान असल्याचे त्याने म्हटले.


कोणते  स्पर्धक सहभागी होणार? रितेश म्हणाला...


रितेश देशमुखने पुढे म्हटले की, बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची सगळी चर्चा झाली आहे. 'बिग बॉस'साठी बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. या शोचा फॉरमॅट माहित आहे, आपल्या काय करावं लागणार याचीही कल्पना आहे. पण, तूर्तास या घरात कोणता स्पर्धक असणार याची कल्पना नसल्याचे रितेशने सांगितले.