मुंबई : जगभरातील टेलिविश्वात धुमाकूळ घालणारा 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. बिग बॉसच्या घरात कोणते सेलिब्रेटी सहभागी होणार, याबाबत चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील आणखी दोन संभाव्य स्पर्धकांची नावं 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहेत.


'जय मल्हार' मालिकेतील खंडोबाच्या व्यक्तिरेखेमुळे घराघरात पोहचलेला लाडका अभिनेता देवदत्त नागे बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये झळकण्याची शक्यता आहे.

'फू बाई फू'च्या पहिल्या पर्वाची विजेती, सुप्रसिद्ध विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदारही बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्याची चिन्हं आहेत. विशाखा नुकतीच कलर्सवरील 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिकेमध्ये नकारात्मक भूमिकेत दिसली होती.

बिग बॉसच्या घरात कोण कोण दिसण्याची शक्यता?

अभिनेता देवदत्त नागे
विनोदी अभिनेत्री विशाखा सुभेदार
ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी
अभिनेता विकास पाटील

अभिनेता आस्ताद काळे
चित्रपट अभिनेता पुष्कर जोग
चित्रपट अभिनेता राजेश श्रुंगारपुरे
चित्रपट अभिनेत्री रेशम टिपणीस
अभिनेत्री मेघा धाडे
शेफ विष्णू मनोहर किंवा पराग कान्हेरे
'एमटीव्ही रोडिज्'मधील मराठी चेहरा

वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी येणाऱ्या ‘बिग बॉस’ची लोकप्रियता अनेकांना माहित आहे. हिंदीमध्ये या ‘बिग बॉस’ची अनेक पर्व पार पडली. त्यानंतर ‘बिग बॉस’च्या दाक्षिणात्य अवतारालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता याच ‘बिग बॉस’चा मराठी अवतार येत्या 15 एप्रिलपासून ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सुरु होत आहे.

मांजरेकर बिग बॉस

मराठी मनोरंजन विश्वाचे बिग बॉस असलेल्या महेश मांजरेकर यांच्या हाती ' मराठी बिग बॉस'ची सूत्रं आहेत. हिंदी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचं सूत्रसंचालन अर्शद वारसीने केलं होतं. दुसऱ्या पर्वात शिल्पा शेट्टी, तिसऱ्यात खुद्द बिग बी अमिताभ बच्चन होस्टच्या भूमिकेत होते. चौथ्या पर्वानंतर मात्र अकराव्या सिझनपर्यंत ही दोर सलमानच्या हाती राहिली.

हिंदीची परंपरा

हिंदी बिग बॉसमध्ये प्रत्येक क्षेत्रातून एखादा सेलिब्रेटी घेण्याची परंपरा अकरा सिझनमध्ये सुरु आहे. रिअॅलिटी शो विजेता, ब्यूटी पेजंट विजेती, मॉडेल, आयटम गर्ल, डेली सोप स्टार, चित्रपट अभिनेता-अभिनेत्री, विनोदी अभिनेता, चित्रपटातून लुप्त झालेले सेलिब्रेटी, राजकीय व्यक्ती, एलजीबीटी समुदायातील व्यक्ती, कायदा मोडल्याने चर्चेत आलेला सेलिब्रेटी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्टार, गायक, क्रीडापटू, फॅशन डिझायनर अशा विविध पार्श्वभूमीचे कलाकार निवडले जातात.

नियम मोडल्यास हिंदी बिग बॉसमध्ये 50 लाख रुपये दंड होता. मात्र मराठीत तो तब्बल दोन कोटी रुपये ठेवण्यात आला आहे. त्यामुळे स्पर्धक सहभाग घेण्यापूर्वी विचार करुनच निर्णय घेतील हे मात्र नक्की.

हिंदी बिग बॉसमध्ये टोकाचे वाद, शिवीगाळ अशा प्रकारांमुळे ही मालिका नेहमीच वादात राहिली. मात्र मराठी कलाकारांची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे या पहिल्याच पर्वात काय होतं, याबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या

'मराठी बिग बॉस'च्या घरात कोण जाणार?
राजेश, मेघा, सुशांतसह विकास पाटीलही 'बिग बॉस'च्या घरात?