मुंबई : शिवानी सुर्वेनंतर बिग बॉसचं घर अभिजीत बिचुकलेने गाजवलं. सुरुवातीच्या काळात अभंग ओव्या गाणारा बिचुकले नंतर मात्र शिव्यांची लाखोली वाहू लागला. कधी रुपाली आणि वीणा सोबतचं भांडण असेल तर कधी शेक्सपिअरला लाजवणारं इंग्रजी असेल किंवा हिना पांचाळसोबत दोन दिवसात जुळलेली केमिस्ट्री असेल, बिचुकलेने बिग बॉसच्या घरातले कॅमेरे आणि प्रेक्षकांचे लक्ष दोन्ही काबीज केलं होतं.


या आठवड्यात अभिजीत बिचुकलेला घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. या अफाट प्रसिद्धीमुळे आणि मनोरंजनामुळे बिचुकले काही घराबाहेर जात नाहीत याची सगळ्यांनाच खात्री असतानाच, काल त्यांना अनपेक्षितपणे बिग बॉसचं घर सोडून जावं लागलं. तीन वर्षांपूर्वी केलेली एक 'बिग चूक' बिचुकलेंना चांगलीच भोवली. त्यामुळे त्यांच्या प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या तव्यावर स्वतःची पोळी शेकणाऱ्या सुरेखा पुणेकर आणि हिना पांचाळ आता या घरात टिकण्यासाठी कोणाचा आधार घेणार हेदेखील पाहावे लागेल.

सध्या बिग बॉसचा विकेंडचा डाव चांगलाच गाजतोय. मागच्या आठवड्यात बिचुकलेंच्या लाडक्या शिवानी सुर्वेला बिग बॉसच्या घरातून निरोपाचा नारळ मिळाला आणि या आठवड्यात बिचुकलेंना अक्षरशः आपला गाशा गुंडाळावा लागला. शिवानी बाहेर पडल्यानंतर तिच्या जागी हिना पांचाळची एन्ट्री झाली आणि त्याचदिवशी दिगंबर नाईकला या घराला राम राम करावा लागला.

शो मस्ट गो ऑन या तत्त्वाला अनुसरुन आज बिग बॉसचा विकेंडचा डाव आहे. या आठवड्याभरात घडलेल्या वेगवान घडामोडींमुळे या विकेंडच्या डावात नेमकं काय घडतंय? बिचुकलेंच्या जागी कोणता नवा चेहरा येणार का? जर कोणी येणार असेलच तर ते नेमकं कोण असणार? या प्रश्नांची उत्तरं या विकेंडच्या डावात मिळतील. त्याचसोबत या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेसाठी निवडलेल्या सुरेखा पुणेकर, विद्याधर (बाप्पा) जोशी, पराग कान्हेरे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप या सदस्यांपैकी कोण घराला अलविदा करणार हेदेखील कळेलच.

या खेळातल्या सहभागाचा विचार करता या आठवड्यात बाप्पा जोशी किंवा सुरेखा पुणेकर या घराबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.