मुंबई : बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात घरातून बाहेर पडणारी मैथिली जावकर पहिली स्पर्धक ठरली आहे. नेहा शितोळे, पराग कान्हेरे, माधव देवचक्के, मैथिली जावकर आणि अभिजीत केळकर असे सहा जण यावेळी नॉमिनेट झाले होते. ज्यामध्ये मैथिलीचा घराबाहेर जाण्यासाठी पहिला नंबर लागला.


घरातून बाहेर आल्यावर जेव्हा तिच्याशी संवाद साधला असता, मला टास्क खेळायची संधीच मिळाली नाही याचं दु:ख तिने व्यक्त केलं. मैथिलीला टास्क खेळायला मिळाले नाहीत हे जरी खरं असलं तरी ते कारण नाही होऊ शकत. कारण जेव्हा तुम्ही बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवता तेव्हाच तुमचा टास्क सुरु झालेला असतो. हे कदाचित मैथिलीला कळलं नसावं.


मुळात मैथिली स्क्रीनवर दिसलीच नाही. यावर तिचं म्हणणं आहे की मला विनाकारण राडा घालण्यात इंटरेस्ट नव्हता. कारण माझा स्वभावच शांत आहे. पण जर मला वाईल्ड कार्ड एण्ट्रीची संधी मिळाली तर मात्र मी माझा अॅटिट्युड नक्की बदलेन, असं मैथिलीनं आवर्जून सांगितलं.


बिग बॉस कोण जिंकणार यावर तिने थेट उत्तर दिलं नाही, मात्र दिगंबर, अभिजीत बिचुकले, सुरेखा पुणेकर यांना फायनलमध्ये पाहायला आवडेल असंही तिने सांगितलं. मैथिलीच्या जाण्यानं घरातल्या सदस्यांवर फारसा फरक पडला नसला तरी पुढचा नंबर कोणाचा या विचारानं सगळ्यांच्याच छातीत धडधड सुरु झाली असेल यात शंका नाही.