मुंबई : मराठी बिग बॉसचा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता टॉप 6 स्पर्धक एकमेकांना भिडतील आणि त्यानंतर ठरेल कोण होणार मराठी बिग बॉस 2 चा विजेता. या सगळ्यामध्ये एक प्रेमकथाही फुलली आहे. ती आहे शिव आणि वीणाची. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर पहिले 15 दिवस एकमेकांना फार नोटीसही न करणारे हे दोघे कालांतराने खूप चांगले मित्र झाले आणि मग ही दोस्ती रिश्ते में कब बदल गयी, हे या दोघांनाही कळलं नाही. बऱ्याच लोकांना अगदी 90 टक्के लोकांना असं वाटतं की टीआरपी वाढवण्यासाठी शिव ठाकरे आणि वीणा जगताप हा प्रेमकथेचा खेळ खेळत आहेत की काय.. याच बद्दलचा थेट प्रश्न एबीपी माझाने विचारला. त्याचं उत्तर त्यांनी जे दिलं ते ऐकाल तर थक्क व्हाल.

बिग बॉसच्या घरात सोमवारी (26 ऑगस्ट) काही पत्रकारांना जायची संधी मिळाली. अंतिम फेरीत पोहोचलेल्या सहा स्पर्धकांना भेटण्याची, त्यांना मनातले प्रश्न विचारण्याची संधी यावेळी देण्यात आली. याला त्या स्पर्धकांनीही मोकळेपणाने उत्तरं दिली. यात अर्थातच रोख होता शिव आणि वीणावर. बिग बॉसच्या घरात आल्यावर या दोघांचं ट्युनिंग झालं आहे ते खरंच आहे की बाहेर गेल्यावर त्यात काही बदल होईल यावर दोघांनी एकमताने 'नाही' असं उत्तर दिलं. म्हणजे, असं की आता जे त्यांचं ट्युनिंग, केमिस्ट्री जमून आली आहे ती कायम राहणार आहे. याबद्दल बोलताना वीणा म्हणाली, "खरंतर आम्ही जे काही वागलो ते काही ठरवून नव्हतं. आमची मैत्री झाली आणि मग आता आमचं खूपच चांगलं ट्युनिंग आहे. त्यामुळे हे नातं आम्ही यापुढे निभावणार आहोत." लग्न कधी करणार याबद्दलही त्यांनी मोकळेपणाने उत्तर दिलं. यावर बोलताना शिव म्हणाला, "मला तर घरी सांगणं फार अवघड जाणार आहे. मी घरी जाऊन काही सांगण्याची गरज नाही. कारण आई माझा हा शो बघत आली आहे. पण आता मी घरी गेल्यावर ती मला काय विचारेल या कल्पनेनेच मी घाबरतोय." यावर एकच हशा पिकला. वीणा याबाबत बोलताना म्हणाली, 'आम्ही लग्न करणार आहोत. आता कुठे करणार ते अजून माहित नाही. पण एक नक्की, की उल्हासनगर आणि अमरावती अशा दोन्ही ठिकाणी आम्ही रिसेप्शन ठेवू आणि तुम्हा पत्रकारांनाही बोलावू.'

शिव आणि वीणाला एकत्र येण्यासाठी बिग बॉस निमित्त ठरतो. लग्नाची चर्चा झाल्यावर वीणाच्या 'पूर्वीच्या' कमिटमेंटवरही चर्चा झाली. यावर बोलताना वीणा म्हणाली, "माझा आधी एक मित्र होता. आमच्यात नातं तयार झालं होतं. पण काही गोष्टी घडल्या आणि मग त्यातून आमच्यात फाटे पडत गेले. आता एकदा माणूस मनातून उतरला की मग माझ्यासाठी कायमचा उतरला. आता मला त्यावर फार काही भाष्य करायचं नाही. त्यामुळे माझ्यासाठी तो विषय आता मिटला आहे."

आता या बातमीनंतर शिव आणि वीणा लग्न कधी करतात ते पाहणं कुतूहलाचं ठरेल यात शंका नाही.

टोमणे, कोपरखळ्या आणि हशा

या पत्रकार परिषदेमध्येही स्पर्धकांमधलं शीतयुद्ध दिसत होतं. यात आघाडीवर होते ते वीणा आणि शिवानी. सीझन झाल्यानंतर तुम्ही कोणत्या स्पर्धकांशी मैत्री कराल आणि कुणाचं तोंड पाहणार नाही यावर वीणा म्हणाली की किशोरीताई, शिव आणि अभिजीत यांच्याशी माझी मैत्री कायम राहिल. आणि बाकीच्यांनी माझं तोंडही पाहिलं नाही तरी मला चालेल. त्यांनी मला काही दु:ख होणार नाही." यावर शिवानीनेही उत्तर दिलं. ती म्हणाली "तोंड पाहणार नाही असं काही होणार नाही. कारण वीणा दिसायला बरी आहे. त्यामुळे भेट झाली तर हाय हॅलो होईलच."