Bigg Boss 17 : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता विनोदवीर भारती सिंह (Bharti Singh) पुन्हा एकदा 'बिग बॉस 17'मध्ये धमाका करण्यासाठी सज्ज आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदवीर भारती सिंह नेहमीच कोणता ना कोणता कार्यक्रम होस्ट करताना दिसून येते. छोट्या पडद्यासह आपल्या व्लॉग आणि पॉडकास्टमध्ये ती व्यस्त असते. काही दिवसांपूर्वी भारती आणि हर्ष लिंबाचिया 'बिग बॉस 17'च्या मंचावर आले होते. त्यावेळी त्यांनी सर्वांना हसवलं. आता पुन्हा एकदा ती या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
'बिग बॉस 17'मध्ये पुन्हा भारती सिंहची एन्ट्री
पापराझीसोबत बोलताना भारती सिंह म्हणाली की,"बिग बॉस'चे अनेक भाग मला पाहता आले नाहीत. पण मी या कार्यक्रमाचा प्रोमो पाहिला आहे. यात अभिषेक बाहेर गेला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. लवकरच पुन्हा घरात जाईल त्यावेळी नक्की काय घडलं हे कळेल".
भारती सिंहचा 'या' स्पर्धकाला सपोर्ट
भारती सिंह पुढे म्हणाली,"बिग बॉस 17'मध्ये अभिषेकला (Abhishek Kumar) माझा पाठिंबा आहे". भारती सिंहचा अभिषेकला पाठिंबा देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिषेकच विजेता होणार, अभिषेक राजा आहे, 'बिग बॉस 17'चा विजेता अभिषेक कुमार, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात स्पर्धकांमध्ये भांडण झालेलं दिसून आलं आहे. दरम्यान अभिषेकने समर्थच्या कानाखाली वाजवली. त्यानंतर कॅप्टन अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) अभिषेकाला शिक्षा दिली. दुसरीकडे भारतीसह अनेक सेलिब्रिटी अभिषेक कुमारला सपोर्ट करताना दिसून येत आहेत. त्यामुळे अभिषेकची पुन्हा 'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. आता या कार्यक्रमाचा कोण विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या