Bigg Boss 16 : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) आता संपला असून रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) या पर्वाचा विजेता ठरला आहे. 'बिग बॉस' या वादग्रस्त कार्यक्रमात दररोज काही ना काही वाद पाहायला मिळाले आहेत. आता या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतरही हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विजेतेपदावरुन चाहते नाराज झाले आहेत. 


'बिग बॉस 16' अंतिम टप्प्यात आल्यानंतर स्पर्धकांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळाली. शालीन भनोट (Shalin Bhanot), अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakare), एमसी स्टॅन (MC Stan) आणि प्रियांका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) हे स्पर्धक 'टॉप 5'मध्ये होते. यात शिव ठाकरे किंवा प्रियांका चौधरी बिग बॉसच्या 16 व्या पर्वाची विजेती होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होते. पण अखेर एमसी स्टॅन या पर्वाचा विजेता ठरला. 


'बिग बॉस 16'च्या विजेतेपदावरुन चाहत्यांमध्ये नाराजी


'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅन झाला असून हा निर्णय चाहत्यांना आवडलेला नाही. त्यामुळे सध्या नेटकरी या कार्यक्रमाला ट्रोल करत आहे. बिग बॉसच्या चाहत्यांना शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये प्रियांका आणि शिवला पाहायचं होतं. पण शिव आणि एस स्टॅन या दोघांमध्ये चुरस रंगली. त्यामुळे शिवचं विजयी होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पण बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) एमसी स्टॅनचा हात उचलत विजेतेपदाची घोषणा केली. 










 


शिव ठाकरेचा मोठा चाहतावर्ग असून तोच या पर्वाचा विजेचा होणार असं म्हटलं जात होतं. 'बिग बॉस मराठी'प्रमाणे हिंदी 'बिग बॉस'देखील शिवने गाजवलं आहे. त्यामुळे तो या पर्वाचा विजेता व्हावा यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्याला वोट्स करण्याचं आवाहन केलं होतं. तर दुसरीकडे 'बिग बॉस 16'मध्ये प्रियांकाचा चांगलाच दबदबा होता. बॉलिवूडच्या कलाकारांनी प्रियांकासाठी खास पोस्ट केल्या होत्या. दोघांनीही आपल्या खेळीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 


नेटकऱ्यांची नाराजी


एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता झाल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी आपली नाराजी व्यक्त करत आहेत. एमसी स्टॅनला कोणत्या निकषावर विजेता म्हणून घोषित केलं हे सांगावं, यापुढे आम्ही 'बिग बॉस' पाहणार नाही, 'बिग बॉस' हा कार्यक्रम पाहणं सोडून देऊ अशा पोस्ट नेटकरी करत आहेत". त्यामुळे आता 'बिग बॉस 17'च्या टीआरपीवर याचा परिणाम होऊ शकतो. 


एमसी स्टॅनच्या पोस्टलादेखील चाहत्यांचा विरोध


बिग बॉसचं 16 पर्व जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याच्या पोस्टवर  चाहते कमेंट्स करत विरोध दर्शवत आहेत. एमसी स्टॅनच्या पोस्टवर शुभेच्छांपेक्षा विरोध करणाऱ्या कमेंट्स जास्त आहेत. खरा विजेता शिव आणि प्रियांका हेच आहेत, एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता होऊ शकत नाही, आम्हाला हा निकाल मान्य नाही, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.