मुंबई : दिलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं तर ते बिग बॉसचं घर कसलं आणि आलेल्या विघ्नात विघ्नसंतोषीपणा नाही केला तर ते बिचुकले कसले. काल पुन्हा एकदा बिग बॉसचं घर बिचुकलेंच्या आवाजाने आणि शिव्यांनी दणाणलं.


काल बिग बॉसने घरातील सदस्यांना एक कार्य सोपवलं. त्यात 1 - 10 क्रमांक क्रमाने उभे करण्यात आले होते. आणि ज्या सदस्याला स्वतःसाठी जो क्रमांक योग्य वाटतोय त्याने त्या क्रमांकावर जाऊन उभं रहायचं होतं. आणि आपण या क्रमांकावर का उभे आहोत याचं स्पष्टीकरणही द्यायचं होतं. टास्क सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल त्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. यात बझर वाजण्याआधीच बिचुकले चौथ्या क्रमांकावर जाऊन उभे राहिले. त्यामुळे रूपालीला सातव्या क्रमांकावर ऊभं राहावं लागलं. आपली योग्यता ही आपल्याला मिळालेल्या क्रमांकापेक्षा जास्त असल्याचं सांगत रुपालीने थेट बिचुकलेंवरच हल्ला चढवला.

आत्तापर्यंत बिचुकले कसे वागले, त्यांनी आपल्या टीमला कसं फसवलं, ते कोणाशी किती आणि कसं खोटं बोलले याचा सगळा लेखाजोखाच मांडला. पण बिचुकलेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत. त्यांनी रुपालीचे हे सगळे आरोप फेटाळून लावले. आता केलेले आरोप फेटाळणं हे राजकारण्यांसाठी काही नवीन नाही म्हणा. पण बिचुकलेंनी आरोप मान्य करण्यास नकार दिल्यावर रुपालीने त्यांच्या भावनिक बाजूलाच हात घातला आणि त्यांना थेट त्यांच्या मुलीची शपथ घ्यायला लावली.

मुलीचं नाव घेतल्यानंतर मात्र बिचुकले चांगलेच बिथरले. ते इतके बिथरले की त्यानंतर ते जे काही बोलले ते पाहताना मूकपट बघितल्याचाच भास झाला. शिव्यांचा प्रचंड भडिमार केल्यामुळे बिचुकल्यांचा आवाज पुन्हा एकदा म्युट करावा लागला. या सगळ्या गडबडीत बिचुकलेंनी आपली चौथ्या क्रमांकावरची जागा सोडली आणि या संधीचा पुरेपुर फायदा घेत रुपालीने ती जागा काबीज केली.



या सगळ्या प्रकारानंतर बिचुकले एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी थेट मी हा खेळ सोडतोय. असले फालतू खेळ मला खेळायचे नाहीत असं म्हणत थेट बिग बॉसना त्यांची बॅग भरायला सांगितली आहे.

आता शिवानी आणि बिचुकलेंची मैत्री तर सर्वश्रुत आहे. शिवानीला घरातून काढल्यानंतर सगळ्यात जास्त दुःख बिचुकलेंना झालं होतं. त्यामुळे असं वागून बिचुकले शिवानीची जागा पुढे चालवणार की शिवानीच्या पावलावर पाऊल ठेवत बिचुकले ही बिग बॉसच्या घराला राम राम करणार हे आता या आठवड्याच्या शेवटी कळेलच.