Deepesh Bhan Last Post: छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर है’ (Bhabi ji Ghar Par Hai) या मालिकेतील ‘मलखान’ हे लोकप्रिय पात्र साकारणारे अभिनेते दीपेश भान (Deepesh Bhan) यांचे काल (23 जुलै) निधन झाले. दिपेशच्या मृत्यूनंतर टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. दीपेशच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ‘भाभीजी घर पर है’ या शोमध्ये दीपेश ‘मलखान’च्या भूमिकेत दिसले होता. आपल्या कॉमेडीने सर्वांना हसवणाऱ्या दीपेशच्या जाण्याने सगळेच दुःखी झाले आहेत. दरम्यान आता त्यांची शेवटची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे.


निधनाच्या एक दिवस आधी दीपेश यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतूनही त्यांनी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना हसवण्याचा प्रयत्न केला होता. या व्हिडीओमध्ये ते आपल्या ‘मलखान’ या पात्राच्या माधमातून लोकांना मजेशीर पद्धतीने माहिती देताना दिसत होते. ते या व्हिडीओमध्ये महिलांमधील संभाषण आणि गॉसिपबद्दल सांगत होते.


पाहा पोस्ट :



इन्स्टाग्रामवर हा रील शेअर करताना दीपेश यांनी म्हटले होते की, 'दोन महिला हळू आवाजात बोलत असतील तर समजून जा की, डेटा ट्रान्सफर होत आहे आणि जेव्हा त्या बोलतील की, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, तेव्हा समजून जा की, डेटा सेव्ह झाला आहे आणि व्हायरल होण्यासाठी तयार आहे.’ अभिनेत्याचा हा व्हिडीओ त्याची शेवटची पोस्ट ठरला आहे. सोशल मीडियावर त्याचा हा व्हिडीओ पाहून हसणारे चाहते आता भावूक होत आहेत.


क्रिकेट खेळताना मृत्यूने गाठलं


दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.


‘या’ मालिकांमध्ये केलेय काम


अभिनेता दीपेश भान सध्या ‘भाभी जी घर पर’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होते. यापूर्वी त्यांनी 'कॉमेडी का किंग कौन', 'कॉमेडी क्लब', 'भूतवाला', 'एफआयआर'सह 'चॅम्प' आणि 'सुन यार चिल मार' सारख्या शोमध्ये काम केले आहे. याशिवाय त्यांनी चित्रपटामध्ये आणि काही जाहिरातींमध्येही कामे केली होती.


हेही वाचा :


Deepesh Bhan Passes Away : क्रिकेट खेळताना मृत्यूने गाठलं, 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन