मुंबई : 'बा, बहू और बेबी' या मालिकेमुळे नावारुपास आलेली अभिनेत्री बेनाफ दादाचंदजी विवाहबंधनात अडकली आहे. नऊ वर्षांपासून डेटिंग करत असलेल्या चिनी वंशाच्या बॉयफ्रेण्डसोबत बेनाफने लगीनगाठ बांधली. नॉर्मन आणि बेनाफ 2009 पासून रिलेशनशीपमध्ये होते. नऊ वर्षांपासून डेटिंग करत असूनही तिच्या प्रेम प्रकरणाची फारशी चर्चा नव्हती. त्याचप्रमाणे बेनाफ मोजके नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत गुपचूप विवाहबंधनात अडकली. बेनाफचा पती नॉर्मन टीव्ही क्षेत्राशी निगडीत नाही. नॉर्मन हा व्यवसायाने शेफ असून त्याच्या मालकीचं मुंबईत रेस्टॉरंट आहे. स्टार प्लस वाहिनीवर 'बा, बहू और बेबी' या हिंदी मालिकेत बेनाफने साकारलेली बेबीची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. याशिवाय तिने झांसी की रानी, छोटी बहू 2, ब्याह हमारी बहू का यासारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. चायना गेट आणि बॉबी जाससू अशा सिनेमातही ती झळकली आहे. लग्नाच्या रिसेप्शनला बेनाफने पांढऱ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. फॅशन डिझायनर स्वप्नील शिंदेने हा ड्रेस डिझाईन केला होता. तर नॉर्मनने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. बेनाफच्या रिसेप्शनला अभिनेता राकेश बापट-रिद्धी डोगरा, हुसैन आणि टीना कुंवरजनवाला, सुचेता त्रिवेदी, रुबिना दिलेक, शरद आणि कीर्ती केळकर यासारखे कलाकार उपस्थित होते.