Asit Kumar Modi Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील अभिनेत्री जेनिफर बंसीवाल आता हायकोर्टात धाव घेणार आहे. मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्याविरोधात फौजदारी प्रकरणात कारवाईची मागणीही जेनिफरने केली आहे. यासाठी आता जेनिफर हायकोर्टातही धाव घेणार आहे. त्याशिवाय, जेनिफर आता पवई पोलीस ठाण्यात या प्रकरणातील एफआयआर दाखल करण्याच्या तयारीत आहे. एफआयआर नोंदवला गेल्यास असितकुमार मोदी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


सुमारे वर्षभरापूर्वी या शोमध्ये मिसेस सोढी यांची भूमिका साकारणाऱ्या जेनिफरने असित मोदीविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पॉश कमिटीने असित मोदीला दोषी ठरवून त्याला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.


'ई-टाइम्स'सोबत बोलताना जेनिफरने सांगितले की, पवई पोलीस ठाण्यात मी जी तक्रार नोंदवली होती. त्यावर अद्याप कोणतीही प्रगती झाली नाही. मी आता पुन्हा पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे अभिनेत्री जेनिफरने सांगितले. मागील आठवड्यात मी तीन वेळेस पोलिसांकडे गेली होती. मात्र, यावेळेस मी माझ्या वकिलांसोबत जाणार असून  पोलिसांनी माझ्यासमोर आरोपपत्र दाखल करावे अशी मागणी करणार असल्याचे जेनिफरने सांगितले. 


5-5 तास पोलीस ठाण्यात बसली... 


जेनिफरने पुढे सांगितले की,  माझ्या तक्रारीवर तपास करणाऱ्या नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात मी शांत राहणार नाही. या प्रकरणात पोलीस कारवाई हवी असल्याचे तिने म्हटले. पोलीस ठाण्यात मी 5-5 तास बसून होती. मी एखादी आरोपी असल्यासारखी वागणूक देण्यात आली. मी अधिकाऱ्यांना जवळपास 100 ऑडिओ रेकोर्डिंगचे ट्रान्सस्क्रिप्ट करून पोलिसांना दिले असल्याचे तिने सांगितले. 


लैंगिक छळ प्रकरणात फक्त नुकसान भरपाई योग्य नाही


जेनिफरने पुढे  म्हटले की,  मी पैसे, नुकसानभरपाई यासाठी हे प्रकरण दाखल केले नव्हते. सुरुवातीला मी माझ्या मानधनाच्या रक्कमेचा विचारही केला नव्हता. मात्र, मित्रपरिवाराच्या सल्ल्यानंतर मी माझ्या कष्टाचा पैसा का घालवावा असा विचार केला. शिक्षेशिवाय फक्त दंड, नुकसानभरपाईचे आदेश हे गुन्हेगारांना पुढील कृत्य करण्यास प्रोत्साहन देण्यासारखे असल्याते जेनिफरने म्हटले. 5 लाख रुपये ही काही मोठी रक्कम नाही असे सांगताना जेनिफरने या प्रकरणी हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


असित कुमार मोदी आर्थिक अडचणीत?


जेनिफरने सांगितले पॉश कमिटीच्या दुसऱ्या सुनावणी दरम्यान, असित मोदींनी आर्थिक अडचणीत असल्याचे कारण देत आपण नुकसानभरपाई देऊ शकत नसल्याचे म्हटले. इतकंच नव्हे तर त्यांनी मी शैलेश लोढा आणि मालव राजदा हे मला उकसवत आहेत. त्यानंतर आणखी नावे घेतली. मी त्यांचे बोलणं रेकोर्ड करत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मोबाईल तपासण्यासाठी मागितला असल्याचे जेनिफरने म्हटले.