Ashok Shinde : 'सारं काही तिच्यासाठी' (Sara Kahi Tichyasathi) ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या माध्यमातून 170 सिनेमे, 105 मालिका आणि 25 नाटकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेच्या माध्यमातून दमदार कमबॅक केलं आहे.
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेबद्दल बोलताना अशोक शिंदे म्हणाले,"या मालिकेची कथा खूपच दमदार आहे. ही गोष्ट आहे संपूर्ण कुटुंबाची आणि तत्वांची. आमच्या ह्या मालिकेचं एक वैशिष्ट म्हणजे या मालिकेत खलनायक, खलनायिका असं कोणीच नाहीये. या मालिकेत प्रत्येकजण खूप मेहनत घेत आहे आणि आपले सर्वोत्तम देत आहे".
'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेत अशोक शिंदे रघुनाथ खोत ही भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना ते म्हणाले,"मी रघुनाथ खोत ही भूमिका साकारत आहे. रघुनाथने अगदी लहान वयातच वडील गमावले. तेव्हापासून त्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. लहान वयातच कुटुंबाची एवढी मोठी जबाबदारी घेतल्याने तो जबाबदार आणि परिपक्व झाला. तो अतिशय शिस्तप्रिय आणि सभ्य स्वभावाचा एक सज्जन व्यक्ती आहे".
अशोक शिंदे पुढे म्हणाले,"प्रोमो मध्ये रघुनाथ दिसायला खूप गंभीर आणि बायकोला आपल्या बहिणीला भेटू देत नाही असं वाटते, किंवा बायको त्याला घाबरते असं दिसतं. पण रघुनाथच्या आयुष्यात असा एक ट्विस्ट येतो जिथे त्या परिस्थितीला कोण जबाबदार आहे, 'सारं काही तिच्यासाठी' चा संपूर्ण अर्थ तिथेच आहे. रघुनाथ हा कर्तव्यनिष्ठ आणि एकदम सच्चा माणूस आहे व आपल्या बायकोवर अतिशय प्रेम करणारा आहे. इतक्या वर्षांच्या अभिनय कारकिर्दीनंतर मला ही वेगळी व्यक्तिरेखा साकारायला मिळाली आहे. मी त्याबद्दल मी खरोखरच आनंदी आहे".
'सारं काही तिच्यासाठी' मालिका करण्याचं अशोक शिंदेंनी का ठरवलं?
अशोक शिंदे म्हणाले,"जवळजवळ आठ वर्षांनंतर पुनरागमन करण्याची ही अप्रतिम संधी दिली आहे, त्यामुळे मी खूपच आनंदी आहे. माझ्या अभिनय कारकिर्दीत मी खूप काळ काम केले आहे. जवळ जवळ 170 सिनेमात नायक खलनायक म्हणून काम केले आहे. माझी ही मालिका 106 वी आहे".
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेबद्दल जाणून घ्या...
'सारं काही तिच्यासाठी' ही होष्ट दोन सख्ख्या बहिणींची गोष्ट आहे ज्या गेले 20 वर्ष एकमेकींना भेटलेल्या नाहीत.
मोठी बहीण उमा तळकोकणात आपल्या सासरी सुखाने नांदतेय आणि लहान बहीण संध्या तिच्या मुली सोबत गेले 20 वर्ष लंडनमध्ये स्थायिक आहे. दोघींच्या आयुष्यात 20 वर्षांपूर्वी एक अशी घटना घडली ज्यामुळे त्या एकमेकींना कायमच्या दुरावल्या. पण म्हणतात ना रक्ताची नाती कितीही लांब गेली तरी मनातला जिव्हाळा कमी होत नाही.
उमाचा नवरा रघुनाथ खोत हे गावातील मोठे प्रस्थ आहे. ते स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. 20 वर्षांपूर्वी रघुनाथरावांना दिलेल्या वचनाखातर उमाने आपल्या लहान बहिणीशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. पण समजा 20 वर्ष पाळलेले वचन काही कारणामुळे उमाला मोडावे लागले तर? अशाच दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे 'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका आहे.
संबंधित बातम्या