मुंबई : लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये अडकल्यानंतर प्रख्यात संगीतकार अनू मलिक यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. अनू मलिक यांना 'इंडियन आयडल 10' या रिअॅलिटी शोमधून हटवण्यात आलं आहे. अनू मलिक यांना परीक्षकापदापासून दूर ठेवण्याच्या सूचना गेल्या काही दिवसांपासून 'सोनी'ने दिल्या होत्या, त्यानंतर वाहिनीकडून अंतिम निर्णय घेण्यात आल्या.

'मी टू' मोहिमे अंतर्गत अनू मलिक यांच्यावर गायिका सोना मोहापात्रा, श्वेता पंडित यांच्यासह काही तरुणींनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. त्यामुळे 'इंडियन आयडल'चे जज म्हणून काम करणाऱ्या अनू मलिक यांना शो सोडण्यास सांगण्यात आलं होतं. यापुढे विशाल आणि नेहा कक्कर यांच्या जोडीला बॉलिवूडमधील नामांकित गायक-संगीतकार कार्यक्रमाचं परीक्षण करतील, असं अधिकृतपणे सांगण्यात आलं.

इंडियन आयडलच्या सध्याच्या सिझनमध्ये 'वाईल्ड कार्ड' म्हणून सहभागी होण्यासाठी एका नवोदित गायिकेला विचारणा करण्यात आली होती. मात्र अनू मलिक शोमध्ये असल्यामुळे तिने नकार दिल्याचं म्हटलं जातं. अनू मलिक यांनी सात वर्षांपूर्वी आपल्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप संबंधित गायिकेने केला आहे.

त्याआधी, गायिका श्वेता पंडितने शान, सुनिधी चौहान यासारख्या प्रसिद्ध गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी अनू मलिकने 2001 साली आपल्याकडे किस मागितल्याचा दावा ट्विटरवरुन केला होता.

सोना मोहापात्रानेही अनू मलिक हे 'सिरीअल सेक्शुअल प्रीडेटर' म्हणजेच वारंवार महिलांचं लैंगिक शोषण करणारे असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. मात्र आपण सोनासोबत कधी काम केलं नाही, इतकंच काय तिला भेटलोही नाही, असा दावा अनू मलिकने केला.

'मी टू'चळवळीचा गैरवापर आपल्या अशीलाचं चारित्र्यहनन करण्यासाठी केला जात असल्याचं, अनू मलिक यांच्या वकिलाने म्हटलं आहे.