Maharashtrachi Hasya Jatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा ठरतो आहे. आज याच हास्यजत्रेच्या मंचावर 'अजय-अतुल' ही जोडी येणार आहे. अजय-अतुल या जोडीने अवघ्या महाराष्ट्राला आपल्या संगीतानी वेड लावले आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम घराघरांत अगदी आवडीने पाहिला जातो. 'इंडियन आयडल मराठी' कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी अजय-अतुलच्या जोडीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर हजेरी लावली आहे.
इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सोनी मराठीवर 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात अजय-अतुल ही जोडी परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान अतुल गोगावले हास्यजत्रेच्या मंचावर एका स्कीटचं सादरीकरण करताना दिसणार आहेत. अजयसाठी हे सरप्राईज असणार आहे. अतुलला सादरीकरण करताना पाहून अजयला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. "आपल्याला हसवणाऱ्या आणि आपलं लॉकडाऊन सुसह्य करणाऱ्या हास्यजत्रेला आपल्या परीने काहीतरी द्यावं म्हणून एखाद्या स्कीटमध्ये सहभागी व्हावं,असा विचार करत अतुलने स्कीटचं सादरीकरण केलं आहे".
'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर सांभाळणार आहे. याआधी स्वानंदी सोनी मराठी वाहिनीवरीलच 'सिंगिंग स्टार' या कथाबाह्य कार्यक्रमाची विजेती ठरली होती. 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे. पुण्यातील नारायण पेठेत भित्तीचित्राद्वारे 'अजय-अतुल' परीक्षण करणार असल्याची घोषणा करण्यात आली होती.
'अजय-अतुल' या जोडीने आतापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती दिल्या आहेत. त्याचप्रमाणे 'इंडियन आयडल' या मंचाने देखील संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. आता हा मंच मराठीतदेखील आल्याने मराठी सिनेविश्वाला देखील अनेक गुणी कलाकार मिळतील अशी आशा आहे. फ्रीमेन्टल या निर्मितीसंस्थेने 'इंडियन आयडल - मराठी' या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha