Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : नुकतीच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेत नव्या तारक मेहताची एन्ट्री झाली आहे. एकापाठोपाठ एक अनेक कलाकार सध्या हा शो सोडत आहेत. तर, हा प्रवास न थांबवता नव्या कलाकारांसह मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज होत आहे. मालिकेतील महत्त्वाचे पात्र असणाऱ्या तारक मेहता अर्थात अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडली होती. यानंतर आता शैलेश लोढांच्या जागी अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) याची वर्णी लागली आहे.


मात्र, नव्या तारक मेहताच्या एन्ट्रीने प्रेक्षक नाराज झाले आहेत. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. मात्र, आता एक एक कलाकार मालिका सोडत असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘दया’, ‘टप्पू’, ‘तारक मेहता’, ‘बावरी’नंतर आता ‘जेठालाल’ देखील मालिकेतून सतत गायब होताना दिसत आहे. त्यामुळे आता ‘जेठालाल’ साकारणारे अभिनेते दिलीप जोशी देखील मालिकेला अलविदा म्हणणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र, आता जेठालाल बदलू नका, नाहीतर मालिका बघणे बंद करू, अशी धमकी देखील चाहते देऊ लागले आहेत. नवीन कलाकारांसोबत मालिका पुढे जात असली, तरी प्रेक्षकांसाठी मात्र नव्या कलाकारांना स्वीकारणे जड जात आहे.



प्रेक्षकांना लोकप्रिय पात्र परतण्याची प्रतीक्षा!


गेल्या 14 वर्षांच्या प्रवासात अनेक कलाकारांनी मालिका सोडली. तर, ‘नट्टू काका’ साकारणारे घनश्याम नायक, आणि ‘डॉक्टर हाथी’ साकारणारे अभिनेते कवीकुमार आझाद यांना देवाज्ञा झाली. या मालिकेत ‘दया बेन’ साकारणाऱ्या दिशा वाकाणीने आई झाल्यानंतर या मालिकेतून ब्रेक घेतला होता. मात्र, अद्याप ती मालिकेत परतलेली नाही. तर, आता ‘टप्पू’ साकारणाऱ्या राज अंदकतने देखील मालिकेला रामराम ठोकला आहे. मालिकेत सध्या ही पात्र दिसतंच नाहीयेत. एकीकडे दया अहमदाबादमध्ये असल्याचे दाखवले जात आहे. तर, दुसरीकडे टप्पू पुढील शिक्षणासाठी आंध्र प्रदेशला गेल्याचे दाखवण्यात आले आहे.    


‘जेठालाल’देखील गायब!


गेल्या काही दिवसांपासून मालिकेच्या कथानकात सातत्याने बदल होताना दिसत आहे. आता या मालिकेत ‘जेठालाल’ देखील सतत कामानिमित्ताने बाहेरगावी जाताना किंवा देवदर्शनासाठी बाहेर गेल्याचे दाखवण्यात येत आहे. सध्या गोकुळधाम सोसायटीत गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. मात्र, या सगळ्या जल्लोषाच्या माहोलात जेठालाल अमेरिकेला गेल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे आता जेठालाल देखील या शोला रामराम म्हणण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या 


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता’ची मालिकेत एन्ट्री होणार! शैलेश लोढा नाही तर ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!