सांगलीच्या भावे नाट्यगृहात 'अलबत्या-गलबत्या' नाटकाचा शो सुरु होता. या नाटकात ते चेटकीणीची मध्यवर्ती भूमिका साकारतात. प्रयोगादरम्यानच मांगले चक्कर येऊन कोसळल्यामुळे प्रेक्षकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं होतं.
सांगलीत तापमानात जवळपास 42 अंश सेल्सिअसच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्यामुळे प्रचंड उकाडत होतं. चेटकीणीची रंगभूषा आणि वेशभूषा जड असल्यामुळे आपल्याला श्वासोच्छवासाचा त्रास झाला, असं मांगले म्हणाले.
प्रयोग संपायला काही मिनिटं बाकी असतानाच डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे ते चक्कर येऊन कोसळले. काही जणांच्या मदतीने मांगले यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.
वैभव मांगले यांनी अनेक मराठी मालिका, नाटकं, चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. 'फू बाई फू' या रिअॅलिटी शोमुळे मांगले घराघरात पोहचले. काकस्पर्श, टाईमपास हे चित्रपट, माझे पती सौभाग्यवती या मालिकेतील स्त्री भूमिकेमुळे ते अधिक प्रसिद्ध झाले.