मुंबई : बॉलिवूडमध्ये दीपिका-रणवीर, प्रियंका चोप्रा-निक जोनास अशा सेलिब्रेटींच्या विवाहाचा सीझन सुरु आहे. मराठी मनोरंजनविश्वातही लग्नसराई सुरु झाली आहे. 'चॉकलेट हिरो' अशी ओळख असलेला अभिनेता अनिकेत विश्वासराव लग्नाच्या बेडीत अडकला. अभिनेत्री स्नेहा चव्हाणसोबत पुण्यात अनिकेत विवाहबद्ध झाला.


फारसा गाजावाजा न करता गुलमोहर विलेजमध्ये अनिकेत-स्नेहाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी दोघांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि मनोरंजन विश्वातील काही कलाकार उपस्थित होते.

विशेष म्हणजे हे अरेंज मॅरेज आहे. स्नेहा-अनिकेतचा साखरपुडा पुण्यातील हिंजवडीमध्ये यावर्षी पाच ऑगस्टला झाला होता. अनिकेत आणि स्नेहाचं लग्न जून महिन्यातच ठरलं होतं.

स्नेहाची आई आणि अनिकेतची मावशी एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. या ओळखीतून दोघं भेटले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. स्नेहा मूळ पुण्याची आहे, तर अनिकेतचं बालपण मुंबईतील बोरीवलीमध्ये गेलं.

37 वर्षीय अनिकेत विश्वासरावने 'अल्फा मराठी' वाहिनीवरील 'नायक' मालिकेतून पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'झी मराठी'वरील 'ऊनपाऊस' मालिकेत त्याने साकारलेली सागरची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावली होती. तेव्हापासूनच अनिकेत अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला.

कळत नकळत, एकापेक्षा एक, महाराष्ट्राचा सुपरस्टार, सुपर वुमन यासारख्या कार्यक्रमातही तो झळकला. याशिवाय लव्ह बर्ड, सुर्याची पिल्ले, नकळत सारे घडले या नाटकातही त्याच्या भूमिका गाजल्या. बघतोस काय मुजरा कर, पोस्टर बॉईज, पोस्टर गर्ल, नो एन्ट्री पुढे धोका आहे, फक्त लढ म्हणा यासारख्या चित्रपटात अनिकेत दिसला.

स्नेहा चव्हाणने सोनी मराठीवरील महाराष्ट्राचा फेवरिट डान्सर या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. याशिवाय ती हृदयात वाजे समथिंग या मालिकेतही भूमिका करते. स्नेहाने यापूर्वी स्वप्नील जोशीच्या 'लाल इश्क' या चित्रपटात भूमिका केली होती. अनिकेत आणि स्नेहा चव्हाण 'हृदयात वाजे समथिंग समथिंग' या चित्रपटात एकत्र झळकले होते.