Aamhi Jato Amuchya Gava: अनेक प्रेक्षकांना नव्या चित्रपटांबरोबरच जुने चित्रपट बघायला देखील आवडते. काही जुने चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात. आता 55 वर्षांपूर्वी रिलीज झालेला आम्ही जातो आमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava) हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. प्रेक्षक कधी आणि कुठे हा चित्रपट पाहू शकणार आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात....


दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, दगडी चाळ 2, बळी, कारखानिसांची वारी अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर आता प्रेक्षकांना  55 वर्षांपूर्वीचा एक चित्रपट पाहायला मिळणार आहे. 55 वर्षांपूर्वीचा  आम्ही जातो आमुच्या गावा  हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. या चित्रपटातील देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, मला हे दत्तगुरु दिसले, हवास मज तू आणि स्वप्नात रंगले मी… ही गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पहाण्याची संधी मिळणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजेच 18 मे रोजी  दुपारी  1  वाजता हा सिनेमा प्रवाह पिक्चरवर प्रेक्षकांना पहाता येणार आहे.






1967  साली रिलीज झालेल्या आम्ही जातो आमुच्या गावा (Aamhi Jato Amuchya Gava)  या सिनेमाला उदंड यश मिळालं. तीन चोर चोरी करण्याच्या उद्देशाने एका घरात शिरतात. मात्र घरातील लोकांकडून मिळालेल्या प्रेमाच्या वागणूकीने त्यांच्यातील माणूसकी जागी होते आणि ते सन्मार्गाला लागतात अशी सिनेमाची कथा. अनेक दिग्गज कलाकार, जगदीश खेबुडकर आणि वंदना विटणकर यांची गाणी आणि सुधीर फडके यांच्या संगीताने या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. असा हा आठवणीतला ठेवा पुन्हा अनुभवायचा असेल तर   55 वर्षांपूर्वी रिलीज झालेला ‘आम्ही जातो आमुच्या गावा ’ हा चित्रपट  नक्की पहा.   उमा भेंडे, मधू आपटे आणि  श्रीकांत मोघे या कलाकारांनी ‘आम्ही जातो आमुच्या गावा ’  या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकरली आहे. 


संबंधित बातम्या


Chala Hawa Yeu Dya : भारत गणेशपुरेंच्या नातवाची थुकरटवाडीत एन्ट्री! आजोबांसोबत आता नातूही हसवणार