Bharat Ganeshpure Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असतात. अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांच्या नातवाने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या भागापासून भारत गणेशपुरे या कार्यक्रमाचा भाग आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते अल्पावधीतच घराघरांत पोहोचले आहेत. या कार्यक्रमाने त्यांना नवी ओळख मिळाली आहे. आता याच कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा नातू त्याच्या करिअरला सुरुवात करत आहे.
'चला हवा येऊ द्या - लहान तोंडी मोठा घास' नव्या पर्वात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी
'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम वर्षानुवर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून आता या कार्यक्रमाचं नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'चला हवा येऊ द्या-लहान तोंडी मोठा घास' असं या नव्या पर्वाचं नाव आहे. नुकत्याच या पर्वाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. 15 मेपासून हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
भारत गणेशपुरे यांच्या नातवाचं नाव अयांश कपिले असं आहे. तो भारत गणेशपुरे यांच्या भाचीचा मुलगा आहे. तो फक्त साडेचार वर्षांचा असून त्याने आता शूटिंगला सुरुवात केली आहे. अयांशला अभिनयाची ओढ कशी लागली असे त्याच्या आईला विचारले असता त्या म्हणाल्या,"माझी आत्या माझ्या बहिणीच्या लग्नात अमरावतीला आली होती तेव्हा तिने अयांशला पाहिले. तिने अयांशची मस्ती, त्याचे बोलणे, त्याचा डान्स पाहिला तेव्हा तिला अयांशमध्ये टॅलेंट दिसले. माझे मामा भारत गणेशपुरेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये काम करीत आहेत त्यामुळे त्यांनी मला अयांशला या कार्यक्रमाच्या ऑडिशनबद्दल सांगितलं. अशी अयांशची अभिनयाची सुरुवात झाली".
'चला हवा येऊ द्या' या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम, निलेश साबळे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके हे कलाकार 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. निलेश साबळे हा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या मालिकांची तसेच चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी येत असते. आता 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये बच्चे कंपनीची कॉमेडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या