Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या चर्चेत आहे. मालिकेत अरुंधती दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. अरुंधतीचं दुसरं लग्न तिच्या मुलांनी आणि सासू सासऱ्यांनी धुमधडाक्यात लावून दिलं आहे. मालिकेत सर्व सकंटांवर मात करत अरुंधतीचा लग्नसोहळा पार पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात अरुंधतीची पाठवणी होताना दिसणार आहे. 


'आई कुठे काय करते' मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अरुंधतीची पाठवणी होत असताना देशमुख कुटुंबीय भावुक झालेले दिसले आहेत. ईशा, यश आणि अभिषेकला आईचा निरोप घेताना अश्रू अनावर झाले आहेत. अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येत असल्याने अप्पा आनंदी आहेत. तर दुसरीकडे अरुंधती आता घरात नसल्याने ते गहिवरले आहेत. 






अप्पा पाठवणीदरम्यान अरुंधती आणि आशुतोषला म्हणत आहेत,"आज लेकीची पाठवणी करत असलो तरी या घराचे दरवाजे तिच्यासाठी आणि तुमच्यासाठी कायमच उघडे असतील. तिचा सांभाळ करा". तर दुसरीकडे कांचन म्हणतं आहे,"अरुंधती आज या घरातून जात असली तरी या घरातील तिचं स्थान दुसरं कोणीच घेऊ शकत नाही". 


अरुंधतीचा नववधू लुकने वेधलं लक्ष


अरुंधतीचा नववधू लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. भगव्या रंगाची पैठणी, कपाळावर मुंडावळ्या, हिरवा चुडा आणि चंद्रकोर असा अरुंधतीचा नववधू लूक आहे. या व्हिडीओवर खूप गोड आहे नवरी, खूपच सुंदर, आता लग्नाची प्रतीक्षा अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 


अरुंधतीच्या आयुष्यात नवा अध्याय सुरु होतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अरुंधतीच्या मनात संमिश्र भावना नक्कीच आहेत. ज्या घराने इतकं भरभरुन प्रेम दिलं त्या घरातून पाठवणी होताना तिचेही डोळे पाणावलेत. अरुंधतीच्या या नव्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षकांना सोमवार ते शनिवार सायंकाळी 7.30 वाजता 'आई कुठे काय करते' ही मालिका पाहावी लागणार आहे.  


'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका अभिनेता मिलिंद गवळी साकारत आहे. तर संजना ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले ही साकारत आहे.


संबंधित बातम्या


Aai Kuthe Kay Karte: 'या वयात लग्न करावं का...?'; आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांची पोस्ट