Balumamachya Navana Changbhala : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रात अनेक थोर संत होऊन गेले आहेत. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे संत बाळूमामा. संत बाळूमामांनी भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याणाचं कार्य केलं आहे. कलर्स मराठीवर दोन वर्षांपूर्वी सुरू झालेली 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' ही मालिका संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. या मालिकेतील संत बाळूमामांचं बालपणातलं रूप आणि त्यांच्या बाललीलांनी रसिकांना अल्पावधीतच भुरळ घातली आहे. पण मोठ्या रूपातील बाळूमामांनी त्यांच्या अस्तित्वाने अकोळसारख्या छोट्या गावात आणि गावकऱ्यांमध्ये चैतन्य फुलवले होते. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राने त्यांच्या त्या रुपावर प्रेम केले होते.  


बाळूमामांच्या प्रपंच, त्यांच्या अपार प्रेमाचा, गोरगरीबांचा कैवार घेत त्यांच्या हितासाठी केलेल्या त्यागाचा, विलक्षण वैराग्याचा साक्षात्कार या मालिकाने रसिकांना घडवला आहे. आता विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बाळूमामांच्या दैवी सामर्थ्याचा नवा अध्याय सुरू होणार आहे. बाळूमामांचं तरुणपण मेंढ्यासोबत रानोमाळ फिरण्यात गेलं होतं. तसेच त्यांचे उत्तरार्ध देखील वेगवेगळ्या ठिकाणी रानोमाळ फिरण्यात गेलं आहे. बाळूमामांसोबत त्यांच्या उत्तरार्धात अनेक माणसं प्रेमाच्या नात्यानं जोडली होती. अनेक कुटुंबांचा ते आधार झाले होते. समाजात जात-पात, अंधश्रद्धा, भेदाभेद या गोष्टी असल्याने बाळूमामा मोठ्या वटवृक्षासारखे आधार देणारे ठरले. 


मालिकेविषयी बोलताना मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित म्हणाले, 'भक्तांच्या मनात वृद्ध बाळूमामांची प्रतिमा कोरलेली आहे. बाल, तरुण बाळू मामा प्रेक्षकांनी पाहिले आहेत. त्यामुळे विजयादशमीच्या मुहूर्तावर वृद्ध बाळू मामांचं दर्शन प्रेक्षकांना होणार आहे. मामांच्या चरित्रात उत्तरार्ध तेवढाच व्यापक आणि सुंदर आहे. संत परंपरेत अहोरात्र कार्य करणाऱ्या मामाचं कार्य या मालिकेमुळे प्रेक्षकांसमोर येणार आहे'. 


बाळूमामांचे निसर्गासोबत जवळचे नाते होते. भक्तांसाठी कार्य करत असताना निसर्गात असलेले सगळे जीव किती महत्तवाचे असतात हे मालिकेतील अनेक प्रसंगातून पटवण्यात आले आहे. मुक्या जीवांचे ते प्रेमाने संगोपन करत होते. मामांनी पाच राज्यांमध्ये भ्रमण करत असंख्य कुटुंबांना भक्तीच्या सूत्रात बांधले होते. मेंढरांसोबत रानोमाळ फिरताना, आस्तीकतेचे, भक्तीचे बीज सगळीकडे ते पेरत राहिले. लोकांच्या मनातील बाळूमामांची प्रतिमा उत्तरार्धातली आहे. लोकांचे त्या प्रतिमेसोबत भावनिक नातं आहे. बाळूमामांचं चरित्र सांगत असताना ही प्रतिमा प्रेक्षकांसमोर घेऊन येणं हे एक आव्हान आहे. कारण ती प्रतिमा त्यांच्या उत्तरार्धातल्या व्यापक कार्याचे प्रतिक आहे, असे मत मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक संतोष अयाचित यांनी व्यक्त केले आहे.