Tejaswini Lonari On Priya Marathe: मराठी मनोरंजन विश्वातली (Marathi Industry) हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठेनं (Priya Marathe) नुकताच जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी प्रिया मराठेचं निधन झालं. तिच्या जाण्याची सल आजही मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात आहे. प्रियाला कर्करोगाचं निदान झालेलं आणि त्यातच तिचं निधन झालं. प्रियाच्या जाण्यानं जेवढा धक्का तिच्या चाहत्यांना बसलाय, तेवढाच धक्का मराठी सेलिब्रिटींना बसलाय. 'तुझेच मी गीत गात आहे', ही प्रियाची शेवटची मालिका ठरली. या मालिकेत काम करत असतानाच तिला कर्करोगाचं निदान झालेलं. त्यानंतर तिनं तब्येतीच्या कारणास्तव तिने मालिका सोडली. अशातच त्या मालिकेत प्रिया मराठेला बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं (Tejaswini Lonari) रिप्लेस केलेलं. आता प्रियाच्या निधनानंतर तेजस्विनीनं तिच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.
तेजस्वी लोणारी नेमकं काय म्हणाली?
बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सकाळ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती. तेजस्वी म्हणाली की, "मला आताही अंगावर शहारे येतात. जेव्हा तिला रिप्लेस करायचं होतं, तेव्हा मी विचारलं होतं की, काय कारण आहे? रिप्लेसमेंट होती तर त्यांना मला कारण सांगावं लागलं... मग मी प्रियाशी बोलले. पण, असं होईल असं मला वाटलं नव्हतं... कारण तिनं छान कमबॅक केलेलं. ती अमेरिकेला होती, तिनं नाटकही केलं. एक महिन्याचा दौरा केला... ती दुसरी सिरीयलही करत होती..."
तेजस्विनी लोणारी पुढे बोलताना म्हणाली की, "माझी तिची भेट तशी कमी व्हायची. पण, ती खूप सुंदर व्यक्ती होती. तिला रिप्लेस केल्यानंतर मला एक महिना दडपण होतं... प्रियाला रिप्लेस करणं म्हणजे... तिचं मराठी, तिची बोलण्याची पद्धत... तिची भूमिकेवरची जरब छान होती. त्यामुळे तिच्याकडून सल्ले घेण्याची हिंमत झाली नाही. मी म्हटलं आपलं काम आपण करूया. मला खूप वाईट वाटलं. तिच्या अंत्यसंस्काराला जाता आलं नाही, कारण मला बरं नव्हतं... पण, एवढी तरुण अभिनेत्री गेली याचा विचारच करू शकत नाही..."
'तुझेच मी गीत गात आहे' मालिका सोडताना प्रियानं केलेली पोस्ट
'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रिया मराठे प्रेक्षकांच्या भेटीला आलेली. पण ही मालिकासुद्धा तिनं मधेच सोडली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत तिनं याबद्दलची माहिती चाहत्यांना दिलेली. त्यात तिनं आरोग्याचं कारण दिलेलं. या मालिकेत तिनं मोनिकाची भूमिका साकारलेली. शूटिंग आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी सांभाळणं कठीण होतंय. माझ्या आरोग्याची समस्याही उद्भवली आहे. माझ्या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळाले. टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, असं प्रिया मराठेनं स्पष्ट केलेलं.
दरम्यान, प्रिया मराठेनं 'चार दिवस सासूचे', 'या सुखांनो या', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते है', अशा मालिकांमधून महत्त्वाची भूमिका बजावलेली. 'तुझेच मी गीत गात आहे' ही तिची अखेरची मालिका तर 'अ परफेक्ट मर्डर' हे शेवटचं नाटक ठरलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :