Tejashree Pradhan on Thane Traffic Issues: मालिकेतून घराघरात पोहोचणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा चाहतावर्ग मोठा आहे. तिनं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. 'होणार सून मी या घरची' या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर तिनं अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. सध्या तेजश्री 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान, अलिकडेच तिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीत तिनं अनेक प्रश्न विचारले. तसेच तिनं यावेळी पर्सनल आयुष्यबाबतही खुलासा केला. दरम्यान, मुंबईतलं प्राईम लोकेशनवरील घर सोडून तिनं ठाण्यात राहण्याचा निर्णय का घेतला? याबाबतही तिनं या मुलाखतीतून खुलासा केला आहे.
तेजश्री गोरेगावातून ठाण्याला का शिफ्ट झाली?
तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेचं शुटिंग करत आहे. तिच्या मालिकेचं सेट ठाणे परिसरात आहे. पण केवळ शुटिंग हेच कारण नाही, तिनं आणखी एका कारणामुळे ठाण्यात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे, आणि ते कारण म्हणजे 'वाहतूक कोंडी'. यामुळे सध्या प्रत्येक जण त्रासलेला आहे. या वाहतूक कोंडीच्या मुद्द्याला धरून तिनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला.
तेजश्रीने मुलाखतीत सांगितलं की, "गोरेगाववरून ठाण्यात येण्यासाठी खूप वेळ जातो. मुंबई ठाणे प्रवासादरम्यान ट्रॅफिक जाम होतो. यामुळे फक्त कलाकारच नाही तर, इतर सामान्यांनाही नाहक त्रास होतो. शुटिंगचे तास आधीपासूनच ठरलेले असतात. परंतु, प्रवासादरम्यान 3 ते 4 तास वाया जातात. ट्रॅफिक जाम ही मोठी अडचण आहे", असं तेसश्री म्हणाली. दरम्यान, वेळ आणि कामात लक्ष केंद्रीत करण्यासाठी तिनं ठाण्यात राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं तेजश्रीनं स्पष्ट केलं.
तेजश्रीनं मुख्यमंत्र्यांना मुलाखतीत, 'ठाण्यातील वाहतूक कोंडीवर तुम्ही काही प्लॅनिंग केलं आहे का?' असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देत देवेंद्र फडणवीस म्हणाले, "ठाणे तसेच MMR क्षेत्रातील वाहतुक कोडींचा प्रश्न गंभीर आहे. ही समस्या सरकारला ठाऊक आहे. यावर उपाय म्हणून ठाण्यात मेट्रो सुरू झाली आहे. याचं काम पुढे देखील सुरू राहिल. तसेच परिसरातील वेगवेगळे भाग देखील जोडली जातील", असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
"मेट्रोमुळे रस्त्यावरील वाहनांची रेलेचेल आणि भार कमी होऊन वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो. यासह आगामी काळात रस्ते रूंदीकरण आणि नवीन फ्लायओव्हर्समुळे सामान्यांचा प्रवास अधिक सुखकर होईल", असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.