गुजराती किड्यांची वळवळ थांबवावी - मनसे
यावर आक्षेप घेत मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही, याचीच शरम वाटत असल्याचं खोपकरांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं
या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार अशी शपथ घेतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापूजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. हे मनोमिलन घडवून आणताना या मालिकेतील वृद्ध बापूजी अर्थात जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा यांच्या तोंडी, मुंबईची भाषा ही हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे.
काय आहे नेमका संवाद
जेठालालचे वडील जयंतीलाल गाडा म्हणजेच बापूजी हे सर्वांचं मनोमिलन करत असताना हा वादग्रस्त संवाद म्हणतात. 'देखो हमारा गोकुलधाम मुंबई में है. और मुंबई की आम भाषा हिंदी है, इसलिए हम सुविचार हिंदी में लिखते है. अगर हमारा गोकुलधाम चेन्नई में होता तो हम सुविचार तामिल में लिखते' असा तो संवाद आहे.
निर्माते काय म्हणाले
हा वाद उफाळल्यानंतर मालिकेचे निर्माता असितकुमार मोदी यांनी सीरियलच्या शेवटी प्रसारित झालेला एक सीन ट्विट करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठीच आहे. यात काही संदेह नाही. मी भारतीय आहे. महाराष्ट्रीय आहे आणि गुजराती देखील आहे. मी सर्व भारतीय भाषांचा सन्मान करतो, असं मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.