मुंबई : पैलवान विष्णू जोशीलकर यांनी 1985 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी अनेक पैलवानांना धडे दिले. आज विष्णू जोशीलकर हे नाव कुस्तीमध्ये अत्यंत आदराने घेतले जाते. आता तेच विष्णू जोशीलकर सिनेमाच्या मैदानात उतरणार आहेत. कारण आगामी तालीम 2 या सिनेमात जोशीलकर काम करणार आहेत.


दिग्दर्शक नितीन रोकडे यांच्या आगामी 'तालीम 2' या चित्रपटाचा टीझर पोस्टर सोशल मीडियावर नुकताच लाँच करण्यात आला. अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाचे संकलन करणाऱ्या नितीन रोकडे यांनी यापूर्वा 'तालीम' चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.


'तालीम'मधून कुस्तीसारख्या लोकप्रिय मैदानी खेळाला रुपेरी पडद्यावर यशस्वीपणे मांडणाऱ्या नितीन रोकडे यांच्या 'तालीम 2' मध्ये आपल्याला देशासाठी असणारी सुवर्ण पदकाची शर्यत पाहायला मिळणार आहे.



या चित्रपटाची कथा नितीन रोकडे यांची असून पटकथा संदीप कुमार रॉय, मधुलिता दास आणि नितीन रोकडे यांची आहे. चित्रपटाचे संवाद जय अत्रे, डॉ. अरुण मिरजकर यांचे असून फारुख खान छायाचित्रणाची जबाबदारी पार पाडणार आहेत. प्रफुल्ल-स्वप्नील या चित्रपटातील गीतांना संगीतबद्ध करणार असून बी.आर. नवीन कुमार साऊंड डिझाइन करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गिस यांचे असून प्रतिक बागडे सहदिग्दर्शन करणार आहेत. कलादिग्दर्शन सुधीर तारकर करणार असून प्रॉडक्शनची जबाबदारी सदाशिव चव्हाण सांभाळणार आहेत.


अभिजीत श्वेतचंद्र, दीक्षा एस प्रशांत मोहिते, अर्जुन कुसंबी, महेश पाटील, विष्णू जोशीलकर या चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.