Assi Film Trailer Out: 2026 वर्षाची सुरुवात ‘बॉर्डर 2’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाने झाली. त्यानंतर राणी मुखर्जीची ‘मर्दानी 3’ प्रदर्शित झाली असून, या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर जोरदार कामगिरी केली आहे. याशिवाय आणखी अनेक मोठे चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या ‘अस्सी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, तो पाहून चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दमदार कथानक आणि गंभीर विषयामुळे हा चित्रपट ‘मर्दानी 3’ला कडवी टक्कर देऊ शकतो, असं चित्र दिसत आहे.
‘अस्सी’चा ट्रेलर प्रदर्शित
तापसी पन्नू स्टारर ‘अस्सी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची टॅगलाईन आहे ‘त्या रात्री ती घरी पोहोचलीच नाही’. यावरूनच चित्रपटाची गंभीरता लक्षात येते. हा एक कोर्टरूम ड्रामा असून तापसी या चित्रपटात वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका बलात्कार पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी झगडताना दिसते.
नेमकी काय आहे कथा?
ट्रेलरवरून समजतं की, ही कथा एका तरुणीभोवती फिरते जी रात्री घरी परतत असताना काही जण तिला जबरदस्तीने गाडीत बसवतात आणि तिच्यावर अत्याचार करून तिला रस्त्यावर फेकून देतात. यानंतर सुरू होतो एक थरारक कोर्टरूम ड्रामा, जो प्रेक्षकांच्या मनाला हादरवून सोडतो. हा चित्रपट समाजातील त्या कटू वास्तवावर प्रकाश टाकतो, जिथे अनेक बलात्कार प्रकरणं न्यायालयात फेटाळली जातात किंवा काही वेळा गुन्हे दाखलही होत नाहीत. अशा परिस्थितीत तापसी तिच्या क्लायंटला, म्हणजेच पीडित महिलेला न्याय मिळवून देऊ शकते का, हा प्रश्न चित्रपटात महत्त्वाचा ठरणार आहे.
कधी होणार प्रदर्शित?
‘अस्सी’ हा चित्रपट 20 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तापसी पन्नूसोबतच या चित्रपटात झीशान अय्युब खान, मनोज पाहवा, कुमुद मिश्रा, सुप्रिया पाठक, सीमा पाहवा, नसीरुद्दीन शाह, रेवती आणि कानी कुसृती महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अनुभव सिन्हा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक प्रभावी आणि विचार करायला लावणारा अनुभव ठरणार असल्याची चर्चा आहे.
