Swarajyarakshak Sambhaji fame Prajakta Gaikwad : 'स्वराज्यरक्षक संभाजी' या गाजलेल्या मालिकेमुळे घराघरात ओळख मिळवणारी आणि ‘महाराणी येसूबाई’ म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं नुकतीच तिच्या आयुष्यातील एका नव्या टप्प्याची सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी तिनं "ठरलं! कुंकवाचा कार्यक्रम" अशी पोस्ट शेअर करत लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. त्यानंतर आता तिचा साखरपुडा पार पडला असून, तो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव काय आहे?
साखरपुड्याचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये प्राजक्ता तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसते. विशेष बाब म्हणजे, तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नावही 'शंभूराज' आहे. व्हिडिओमध्ये प्राजक्तानं पांढऱ्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. त्या ब्लाऊजवर ‘शंभूराज’ असं खास लिहिलेलं आहे. तर तिचा होणारा जोडीदार पांढऱ्या रंगाच्या जोधपुरी सूटमध्ये असून त्याच्या कोटवर ‘प्राजक्ता’ असं लिहिलं आहे. त्यांच्या या वेषभूषेतून परस्परांवरील प्रेम स्पष्टपणे व्यक्त होत आहे.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत प्राजक्तानं साकारलेली महाराणी येसूबाईंची भूमिका आजही लोकांच्या मनात घर करून आहे. आणि आता प्रत्यक्ष आयुष्यातही तिच्या जीवनात 'शंभूराज'चं आगमन झालं आहे, ही गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी विशेष आनंददायक आहे. ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘आई माझी काळुबाई’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून प्राजक्तानं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनय क्षेत्रात ती नेहमीच चमकदार कामगिरी करत आली आहे. आता ती वैयक्तिक आयुष्यातही एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या