Swara Bhasker on Chhava : स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या जीवनावर आधारित छावा (Chhava) हा सिनेमा 14 फेब्रुवारी रिलीज झाला. त्यानंतर या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय. एका आठवड्यात सिनेमाने 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्नाच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या हा सिनेमा पाहून अनेक तरुणांना अश्रू अनावर झालेलेही पाहायला मिळाले होते. शंभूराजांनी बुऱ्हाणपूरची लूट केल्यानंतर औरंगजेब सूडाने पेटला आणि दिल्ली सोडून तो दक्षिणेत चाल करुन आला. त्यानंतर संभाजी महाराजांनी त्याला नऊ वर्ष झुंज दिली, असा सर्व ऐतिहासिक घटनाक्रम हा सिनेमात दाखवण्यात आलाय. दरम्यान, सिनेमाला सर्वांकडून तुफान प्रतिसाद मिळत असताना अभिनेत्री स्वरा भास्करने याबाबत वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर संपूर्ण देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठलेली पाहायला मिळाली. अखेर स्वराने तिच्या वादग्रस्त पोस्टवर आज X या प्लॅटफॉर्मवरुन स्पष्टीकरण दिलंय.
स्वरा भास्कर स्पष्टीकरण देताना काय काय म्हणाली?
स्वरा म्हणाली, मी केलेल्या ट्वीटमुळे अनेक वादविवाद पाहायला मिळत आहेत. काही गैरसमज देखील निर्माण झाले आहेत. मी निःसंशयपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर वारशाचा आणि योगदानाचा आदर करते.. विशेषत: सामाजिक न्याय आणि स्त्रीयांच्या सन्मानासाठी मांडलेल्या भूमिकांचाही मी आदर करते. माझा मुद्दा एवढाच आहे की, आपल्या इतिहासाचा गौरव करणे खूप छान आहे, पण कृपया सध्याच्या चूका आणि लपवण्यासाठी ऐतिहासिक वैभवाचा गैरवापर करू नका. इतिहास हा नेहमी लोकांना एकत्र आणण्यासाठी वापरला गेला पाहिजे. लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी आणि सध्याच्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी नाही.
स्वरा भास्कर काय म्हणाली होती?
चेंगराचेंगरी होऊन लोकांचे भयावह मृत्यू झाले आहेत, पण ते सोडून चित्रपटातील 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून लोक भावूक होत असतील किंवा संताप व्यक्त करत असतील तर तो समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय. गैरव्यवस्थापनामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यांचे मृतदेह बुलडोझरद्वारे काढावे लागले. यावर चिंता न व्यक्त करता समाज 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होत आहे, संताप व्यक्त करत आहे, असं स्वरा भास्करने म्हटलं होतं.