Swanandi  Berde :  मराठी सिनेप्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे ( Laxmikant Berde ) यांची मुलगी स्वानंदी बेर्डे (Swanandi  Berde) आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लक्ष्मीकांत-प्रिया बेर्डे यांचा मुलगा अभिनय याने आधीच सिनेसृष्टीत प्रवेश केला  आहे. अभिनयनंतर (Abhinay Berde ) आता त्याची बहिण स्वानंदी ही आता 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून आपला सिनेजगतामधील प्रवास सुरू करणार आहे. या चित्रपटात स्वानंदी रोमँटिक भूमिकेत असणार आहे.  सुमेध मुदगलकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत असणार आहे. 


सुपरस्टार दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक अभिनेत्री स्वानंदी बेर्डे या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार  असल्याने चाहत्यांची उत्सुकता आता वाढली आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 


 याआधी स्वानंदीने नाटक, एकांकिकेतून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. त्यानंतर आता  मुख्य भूमिका असलेला स्वानंदीचा हा पहिलाच चित्रपट आहे. तर स्वानंदीच्या जोडीला या चित्रपटात संपूर्ण भारतात भगवान श्रीकृष्ण यांचे रुप साकारत दर्शन देणारा अभिनेता सुमेध मुदगलकर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सुमेधने याआधी बऱ्याच चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. आता स्वानंदी व सुमेध यांची फ्रेश जोडी 'मन येड्यागत झालं' या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तर अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत.






 


'श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन' अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. 


चित्रपटाच्या संगीताची धुरा निलेश पतंगे यांनी सांभाळली आहे. सुदर्शन पांचाळ, सिद्धेश पतंगे यांनी गीतलेखन केले आहे. या चित्रपटाच्या गाण्यांना जावेद अली, आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, आनंदी जोशी, निलेश पतंगे यांनी स्वर दिला आहे.