Suraj Chavhan wedding: बिग बॉस सीजन 5 विजेता सुरज चव्हाण काल 29 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकला. अतिशय थाटामाटात 'झापुक झुपुक' सुरज चव्हाणच्या (Suraj Chavhan) लग्नाचा बार उडाला. सुरजच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे. त्याच्या लग्नातील हळद, मेहंदी, प्री-वेडिंग शूट ते अगदी वरातीपर्यंतचे फोटो चाहत्यांनी अक्षरशः उचलून धरले होते. घोड्यावर नवरदेव म्हणून लग्नमंडपात गुलीगत एन्ट्री घेतलेला सुरज गर्दीतून वाट काढत पुढे गेला. बोहल्यावर चढला आणि उपस्थित असंख्य जवळच्या लोकांनी जल्लोषात त्याचं लग्न लावलं. सुरज चव्हाण आता पुरंदरचा जावई झालाय. पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील संजना गोफणे हिच्याशी त्याचा विवाह पार पडला आहे. पुरंदर तालुक्यातील खळद येथील माऊली गार्डन या मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात सुरज चव्हाणचा विवाह सोहळा पार पाडला. काल सायंकाळी 6 वाजताच्या गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला.
लग्नामध्ये सुरज आणि संजना या दोघांनीही पारंपरिक लूक केला होता. संजनाने निळ्या रंगाची देखणी साडी नेसली होती. सोनेरी रंगाचा शेला, नथ हिरवा चुडा आणि दागिने असा लुक होता. तर सूरजने पांढऱ्या रंगाची जोधपुरी घातली होती. दोघेही लग्नात खूप खुश दिसत होते. सोशल मीडियावर दोघांच्याही लग्नाचे फोटो धुमाकूळ घालत आहेत. बिग बॉस फेम जानवी किल्लेकर करवली म्हणून प्रत्येक विधीमध्ये दिसली. सुरज च्या लग्नात बिग बॉसच्या घरातील धनंजय पोवार, पॅडी , यांच्यासह अनेक राजकीय मान्यवरही सहभागी झाले होते. अनेक इन्फ्लुएन्सर्सने सुरजच्या लग्नात हजेरी लावली होती.
गेल्या काही दिवसांपासून सुरजच्या लग्नापूर्वीच्या विधी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. संजनाने सुरज च्या गळ्यात वरमाला घालताच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. भाऊचं करियर पण झाला आणि लग्नही झालं असे कॅप्शन देते चाहत्यांनी कमेंट करत सुरजला शुभेच्छा दिल्या आहेत. सुरज चव्हाण आणि संजना गोफणे या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. संजना ही सुरज च्या चुलत मामाची मुलगी आहे. टिक टॉक वर म्हणून स्टार असलेला सुरज बिग बॉस सीजन 5 च्या मध्ये आला. त्याच्या गुलगत स्टाईल मुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. बिग बॉसचा विजेता झाला आणि महाराष्ट्रभर त्याने नाव कमावलं.