Suraj Chavan Pays Tribute at Ajit Pawars Funeral: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर केवळ बारामती नसून, संपूर्ण राज्य हळहळला. 28 जानेवारी रोजी त्यांचं अपघाती निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार पार पडले. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी पार पडली. त्यांना शेवटच्या निरोप देण्यासाठी जनसमुदाय उसळला होता. साश्रु नयनांनी नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. याच गर्दीत त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सूरज चव्हाणही बारामतीत पोहोचला. मात्र, दादांच्या लाडक्या सूरजला अंत्यदर्शन मिळालं नाही. सूरजने काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये शेअर केला आहे.
सूरज चव्हाण अजित दादांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीमध्ये पोहोचला होता. त्याला गर्दीत कुणी ओळखू नये, यासाठी तो तोंडाला रूमाल बांधून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पोहोचला होता. सर्वसामान्यांप्रमाणे तो रांगेत उभा होता. दादांचं शेवटचं दर्शन व्हावं अशी त्याची इच्छा होती. दरम्यान, लाखो लोकांची रांग काही लवकर संपली नाही. दादांची अखेरची भेट घेऊपर्यंत खूप उशीर झाला होता. सूरजला दादांची शेवटची भेट घेता आली नाही. सूरजने शेवटी चितेवर डोकं टेकावून दादांना शेवटचं वंदन केलं.
दादांवर अंत्यसंस्कार विधी पार पडल्यानंतर सूरजने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. दादांचे अंत्यदर्शन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला, तसेच कॅप्शनद्वारे भावना व्यक्त केल्या. त्यानं कॅप्शनमध्ये म्हटलं की, "आई - वडिलांनंतर मी तुमच्यात आई आप्पा पाहात होतो. तुम्ही मला सोडून गेलात. आता पोरक्या सूरजनं नेमकं कुणाकडे पाहावं? I MISS YOU DADA...", असं म्हणत त्यानं भावनांना वाट मोकळी करून दिली. या व्हिडिओतून आणि कॅप्शनमधून सूरजने अजित दादांप्रति असलेल्या भावना व्यक्त केल्या. त्याची पोस्ट पाहून अनेकांना अश्रु अनावर झाले आहेत.
सूरज चव्हाण आणि अजित दादांचं नातं अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचं होतं. सूरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली. त्यानंतर अजित दादांनी त्याला बारामतीच्या मोढवे गावात हक्काचं घर बांधून दिलं. सूरजने पोस्ट समाजमाध्यमांमध्ये शेअर करून अजित पवार यांचे मनापासून आभार मानले होते.