Sunil Barve on CJP Protest: नीट पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. CJPच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळताना दिसतोय. अनेक मराठी- हिंदी कलाकार, दिग्गजांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचं म्हणत विद्यार्थ्यांच्या मागे उभे राहिलेत. तर अनेकांनी सरकारच्या भूमिकेची पाठराखण केल्याचं दिसलं. अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपली बाजू मांडली आहे. त्यांची पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ लपले नाहीत ना, हाकणात यात आपण बळी पडत नाही ना? असा सवाल करत अभिनेत्री सुनील बर्वे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अनेकांनी ट्रोलिंग सुरू केलंय. 'ही भूमिका आधी का घेतली नाही?' असा सवाल अनेकांनी त्यांना या पोस्टखाली विचारलाय. काहींनी त्यांच्या भूमिकेचे स्वागतही केले आहे.
काय म्हणाले सुनील बर्वे?
कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर सुनील बर्वे म्हणाले 'नमस्कार, मी सुनील बर्वे. एका अत्यंत गंभीर किंवा संवेदनशील विषयावर माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून, खरंतर महिन्याभरापासून म्हटलं तरी चालेल; आपल्याकडे आंदोलन सुरू आहेत. सरकारच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत. या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की नीट परीक्षेचं प्रकरण असू देत, पेपर फुटीचे प्रकरण असू देत किंवा सोनम वांगचुकजी यांचा उपोषण असू देत, पण याचा कदाचित गैरफायदा कुठल्यातरी राजकीय अधिष्ठानासाठी घेतला जातोय. आपण जेव्हा आंदोलन करतो, तेंव्हा आपल्यावर कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही ना, कोणाचे छुपे अजेंडा साधून घेण्याचा प्रयत्न नाही ना, हे पाहणंही आपलं महत्त्वाचं कर्तव्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं, मी सर्वप्रथम सोनम वांगचुक यांना विनंती करतो की त्यांनी उपोषण मागे घ्यावं. त्यांनी सरकारची चर्चा करावी.यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढावा. याच पद्धतीने नीट परीक्षेचा आंदोलन सुरु आहे. जे झालंय ते अतिशय खेदजनक आहे.क्लेशकारक आहे.
'यामध्ये जी मंडळी भरडली गेली असतील, ज्यांचं नुकसान झालंय. त्यांच्या घरच्यांप्रती मी माझ्या सहवेदना व्यक्त करतो. अत्यंत दुःखदायक अशा गोष्टी आहेत या. कुठल्याही विद्यार्थ्यांचा, तरुणाचा जीव जाऊ नये, हे अंतिम उद्दिष्ट असावे. माझी सरकारला ही विनंती आहे की, आता तुम्ही चर्चेसाठी तुमचे दरवाजे खुले केले आहेत तर साधक बाधक चर्चा व्हावी.विद्यार्थ्यांसाठी जो आवश्यक निर्णय असेल तो त्यांनी घ्यावा. दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी. माझे सगळ्यांना विनंती आहे, आपले विचार कदाचित वेगळे असतील, पण या विचारान पलीकडे जाऊन कोणाचा तरी जीव हा महत्त्वाचा असतो. तो सामान्य व्यक्तीचा असू दे किंवा प्रतिष्ठित व्यक्तीचा असू दे. कोणाचाही जीवाला धोका होऊ नये हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.' असं सुनील बर्वे म्हणाले आहेत.
अभिनेते सुनील बर्वे यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने म्हटले ' हेच आधी का म्हटले नाही ?' तर काहींनी विरोधी बोलताना एवढे का घाबरता? असा सवालही केलाय.. एक चाहतीने म्हटले " सध्याच्या परिस्थितीबाबत इतका संतुलित आणि राजकारणापासून अलिप्त दृष्टिकोन मांडल्याबद्दल धन्यवाद. पण तुमच्यासारखा विचार प्रत्येकजण करत नाही. अनेक अभिनेते या आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत आणि विद्यार्थ्यांबद्दल त्यांना किती काळजी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण खरोखरच त्यांना विद्यार्थ्यांची चिंता आहे का, की हा केवळ प्रसिद्धी मिळवण्याचा आणि फोटो काढून घेण्याचा एक प्रकार आहे?"
