Suniel Shetty on Eknath Shinde : संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. गोविंदा रे गोपाळाच्या तालावर अनेक गोविंदा पथक थरावर थर रचून हंडी फोडतायत. हाच उत्साह सध्या महाराष्ट्रभरात आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी राजकीय पक्षाकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवाला अनेक सेलिब्रेंटीनी देखील हजेरी लावली आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं. 


ठाण्यातील टेंभी नाका परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दहीहंडीचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी या बॉलीवुडच्या सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. तसेच अभिनेता सुनील शेट्टी याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ असा उल्लेख करत त्यांचं भरभरुन कौतुकही केलं. 


'माझ्यासाठी ते माझे भाऊच...'


सुनील शेट्टीने म्हटलं की, 'नमस्कार कसे आहात सगळे..? मी प्रत्येक वर्षी इथे येतो आणि हे सगळं पाहतो. दरवर्षी याचं प्रमाण मोठं होतं चाललं आहे. दहीहंडीसाठी ही एक हक्काची जागा झाली आहे, जी साहेबांनी तुमच्यासाठी करुन घेतलीये. त्याची मज्जा घ्या तुम्ही सगळ्यांनी. सांभाळून करा सगळ्यांनी. प्रो गोविंदा लीगही आता सुरु झालंय. साहेब मुख्यमंत्री आता झालेत पण माझ्यासाठी ते माझे भाऊच आहेत. इतकच नव्हे तर श्रीकांतसोबतही माझं पर्सनल नातं आहे. त्यासाठी गणपती, दहीहंडी मी वर्षानुवर्षे येतोय. आमचं शुटींगही सगळं इकडच होतं. 'मे तुम्हे भूल नही सकता हो तुम मुझे भूल जाओ ये मे होने नही दुँगा' असाच इकडचा सणही आहे, जे मी कधीच विसरणार नाही.जयहिंद जय महाराष्ट्र'


यावेळी जॅकी श्रॉफ देखील उपस्थित होता. त्यानेही या सोहळ्यासाठी आमंत्रित केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. अभिनेत्री अनुषा दांडेकरही यावेळी उपस्थित होती. यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह देखील पाहायला मिळाला. ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केही यावेळी मंचावर उपस्थित होते.                                                                                  


 



ही बातमी वाचा : 


गौतमीला खुन्नस देणाऱ्या राधाच्या अदा, मुंबईकर फिदा; कोण आहे घायाळ करणारी नृत्यांगणा?