Raj Thackeray ON Sulochana Latkar Death : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह चाहतेदेखील त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 'अशी आई होणे नाही', असं म्हणत भावनिक पोस्ट शेअर करत सुलोचना दीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांनी ट्वीट करत लिहिलं आहे,"सुलोचना दीदींचं निधन झालं. 'दीदी' ही उपाधी चिकटणं जितकं सोपं तितकी ती पेलवणं अधिक अवघड. ही उपाधी पुढे चिकटली काहींना..पण पेलवता आली फक्त लता दीदींना आणि सुलोचना दीदींना. कारण दोघींच्यात असलेला सोज्वळपणा, ठेहराव आणि कामाप्रतीची निष्ठा यामुळे. हिंदी सिनेमात 60,70 आणि 80 च्या दशकाच्या पूर्वार्धापर्यंत 'आई' हे सिनेमातलं महत्त्वाचं पात्र असायचं. पण 'आई'पण पडद्यावर ज्यांनी जिवंत केलं ते फक्त निरुपमा रॉय आणि सुलोचना दीदींनी. बाकीची आईची पात्र ही एकतर बालिश केली गेली आणि त्यांच्यात नकारात्मक छटा आणल्या गेल्या".
राज ठाकरेंनी पुढे लिहिलं आहे,"सुलोचना दिदींच्यात आईपण हे अंगभूत होतं. त्यामुळे त्यांना पडद्यावर भूमिका वठवताना विशेष अभिनय करावा लागलाच नाही. त्यामुळे त्यांच्या आईच्या भूमिका आयुष्यभर लक्षात राहिल्या. पण हिंदीत जितकं वैविध्य नाही मिळालं तितकं वैविध्य त्यांना मराठी सिनेमांत मिळालं, हे मराठी सिनेमाचं भाग्य. एखादी भूमिका प्रेक्षकाला इतकी विश्वासार्ह वाटावी असा योग दुर्मिळ असतो, जो सुलोचना दीदींच्या वाट्याला आला होता. अशी आई होणे नाही, अशी दीदी होणे नाही. सुलोचना दीदींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली".
सुलोचना दीदींच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,"सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना. ओम शांती".
सुलोचना दीदींचा सिनेप्रवास जाणून घ्या...
सुलोचना दीदी यांनी 1946 साली मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. सासुरवास, वहिनीच्या बांगड्या, मीठ भाकर, सांगते ऐका, लक्ष्मी आली घरा, मोठी माणसं या गाजलेल्या मराठी सिनेमांत सुलोचना यांनी काम केलं आहे. आजवर त्यांनी 250 हून अधिका मराठी-हिंदी सिनेमांत काम केलं आहे. अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या