Sulochana Chavan : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण (Sulochana Chavan) यांच्यावर मुंबई येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे पुत्र विजय चव्हाण यांनी त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सुलोचनाबाई यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच इतर अनेक कलावंत उपस्थित होते. 


ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. सुलोचनाबाईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली. कृष्ण सुधामा या हिंदी चित्रपटात त्यांनी पहिलं गाणं गायलं. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाहिली श्रद्धांजली    


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्वीट शेअर करून सुलोचना चव्हाण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने अनेक लावण्या ठसकेबाज करणाऱ्या महाराष्ट्राच्या ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी, पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले. त्यांच्या निधनाने स्वरांच्या आकाशगंगेतील एक तारा निखळला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो.'


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या


माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'सुलोचना चव्हाण. गायन क्षेत्रामधील एक दिग्गज व्यक्ती ज्यांचं नाव घेतलं की तीच व्यक्ती समोर येते त्यांच्यापैकीच एक त्या होत्या. त्या मनामध्ये कायम राहणाऱ्या व्यक्ती होत्या. मी शिवसेनेच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो.'


17 मार्च 1933 साली त्यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी आयुष्यभर गायन आणि लावणी कलेची सेवा केली. सुलोचना चव्हाण यांच्या निधनामुळे लावणीचा सूर हरपल्याची भावना व्यक्त केली जातेय. आपल्या ठसकेबाज लावणीनं सुलोचना चव्हाण यांनी मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेलं होतं. त्यांचा आवाज ऐकला की त्या आवाजात एक वेगळाच भारदस्तपणा होता. एक ठसकेबाजपणा होता. सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातला भारदस्तपणा शब्दांत मांडता न येणारा असाच आहे. 


सुलोचना चव्हाण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे राम कदम पुरस्कार, 'मल्हारी मार्तंड’साठी मिळालेला सर्वोत्कृष्ट लावणी गायिकेचा सन्मान, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं.  


महत्त्वाच्या बातम्या : 


Sulochana Chavan Passes Away : लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वृद्धापकाळाने निधन; 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास