Sukanya Mone :  सध्या संपूर्ण देशभरात बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाप्पाची आराधना, त्याची सेवा यामध्ये प्रत्येकजण मग्न झालाय. त्यातच सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात आकर्षक देखावे, सुबक मुर्ती पाहण्यासाठीही बरीच गर्दी जमा झालीये. त्यामुळे विशेषत: मुंबईत प्रत्येक रस्त्यावर गणेशभक्तांची गर्दी पाहायला मिळतेय. पण असं सगळं असलं तरीही या उत्सवाचं स्वरुप हे काळानुसार बदलत गेलंय. या सगळ्यावर अनेकदा अनेकजण व्यक्त होताना दिसतातच. यावर आता अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने (Sukanya Mone) यांनीही त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. 


काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी याविषयी त्यांचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता सुकन्या मोने यांनीही याविषयी भाष्य केलं आहे. सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.                                              


 'त्या उत्सवाचं स्तोम आता खूप झालंय'


सुकन्या मोने यांनी बोलताना म्हटलं की, 'प्रत्येकाने उत्सव आपल्या आपल्या परीने करावाच. पण त्या उत्सवाचं स्तोम आता खूप झालंय, असं मला वाटतं. याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. साधं दहिहंडीलासुद्धा आपण मोठमोठे स्पीकर लावतो, तेव्हा आपण आजूबाजूचा विचार करत नाही. आपण नागरिक आहोत, मुळात आपण माणूस आहोत याचा विचार करायला हवा. काहींच्या घरामध्ये जेष्ठ नागरिक असतात, काहींची परीक्षा सुरु असते, काही ठिकाणी आजूबाजूला हॉस्पिटल असतात. याचा विचार व्हायला हवा.'                        
 
पुढे त्यांनी म्हटलं की, 'आपल्याकडे मोठेमोठे गणेशोत्सव साजरे करतात, त्यामुळे दर्शनाला जाताना चेंगराचेंगरी होते. त्यामध्ये अनेकांचे जीव जातात. दर्शन तर होत नाहीच. अगदी कधी कलाकार किंवा खेळाडू जरी तिकडे गेले तरी त्यांचे फोटो काढणं, त्यांचे व्हिडीओ काढणं यातच तुमचा सगळा वेळ जातो. तसं करु नका, मनोभावे तुम्ही तिकडे जा आणि त्याचं दर्शन घ्या.'                                   


ही बातमी वाचा : 


Malaika Arora Father Death :  मलायका अरोराच्या वडिलांचा मृत्यू नेमका कशामुळे? पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आली महत्त्वाची माहिती