Phulrani Marathi Movie : अभिनेता सुबोध भावेचा (Subodh Bhave) 'फुलराणी' Phulrani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या सिनेमात 'फुलराणी'ची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता लागली होती. 'ती येतेय... ती येतेय' असं म्हणत तिचं जोरदार प्रमोशन सुरु होतं. अखेर आज तिची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. 'फुलराणी'च्या भूमिकेत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहेचलेली प्रियदर्शनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) झळकणार आहे.
'फुलराणी' या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील फुलराणीच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हटके स्टाईल, फाडू स्माईल, मनाने दिलदार असलेल्या फुलराणीचा दमदार स्वॅग चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. प्रियदर्शनी इंदलकर या सिनेमात शेवंता तांडे म्हणजेच फुलराणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
सुबोध भावेने 'फुलराणी' या सिनेमाचा टीझर शेअर करत लिहिलं आहे,"दिसते जरी अल्लड, आहे मोठी शहाणी, नडेल हिला जो त्याला पाजेल ही पाणी... भाषा जरी रावडी गाते गोड गोड गाणी, झगा मगा हिला बघा, आली आली 'फुलराणी". सुबोधच्या या पोस्टवर 'फुलराणी मनापासून आवडली', 'कळली फुलराणी...आवडली तिची रावडी वाणी, धमाल करणार अल्लज फुलराणी', अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
'फुलवाली नाय फुलराणी बोलतात मला', 'मिस कोळीवाडा', 'झगा मगा मला बघा', टीझरमधील 'फुलराणी'च्या या डायलॉगने सिनेप्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता फुलराणीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
'या' दिवशी 'फुलराणी' येणार प्रेक्षकांच्या भेटीला! (Phulrani Release Date)
'फुलराणी' हा सिनेमा नवीन वर्षात पुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच येत्या 22 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे. 'पिग्मॅलिअन' या गाजलेल्या नाट्यकृतीवर आधारित या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा विश्वास जोशीने सांभाळली आहे. तर गुरु ठाकूरने या सिनेमाची कथा लिहिली आहे. तगडी स्टारकास्ट, दर्जेदार लेखन आणि उत्कृष्ट दिग्दर्शन या सगळ्या गोष्टींमुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी शक्यता आहे.
संबंधित बातम्या