Star Pravah new serial Anandi cast and release date: स्टार प्रवाहवरील प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे.  या मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आनंदी या मालिकेचा पहिला प्रोमो रिलीज झालाय. या प्रोमोला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या प्रोमोमधून आपल्याला या मालिकेत कोण मुख्य भूमिका साकारणार? याची माहिती मिळाली आहे.  या मालिकेतून दोन दिग्गज कलाकार आपल्या भेटीस येणार आहे.  अरुण नलावडे आणि समीर धर्माधिकारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

आनंदी या मालिकेत अभिनेते अरुण नलावडे आनंदी या पात्राच्या  आजोबांची भूमिका साकारणार आहे.  आत्माराम जाधव, असं त्यांच्या पात्राचे नाव आहे.  तर, समीर धर्माधिकारी हे प्रसिद्ध उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची भूमिका साकारणार आहेत.  या निमित्ताने दोन दिग्गज कलाकार बऱ्याच काळानंतर मालिकेच्या विश्वात पुनरागमन करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये  ही मालिका पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

या भूमिकेविषयी सांगताना अभिनेता समीर धर्माधिकारी म्हणतात, 'स्टार प्रवाह या चॅनेलसोबतची  माझी पहिली मालिका.  जवळपास 7 वर्षांनंतर मी मालिका विश्वात पुन्हा पाऊल ठेवतो आहे.  या  मालिकेतून एक वेगळा विषय हाताळला जातो आहे.  या मालिकेत मी युगंधर ही व्यक्तीरेखा साकारत आहे.  काम म्हणजे त्याच्यासाठी धर्म.  गावकऱ्यांसाठी युगंधरचा शब्द हा अंतिम असतो.  कारण त्यानं गावकऱ्यांना रोजगार मिळवून दिला.   यामुळे कित्येक संसार उभे राहिले.  आजही गावातील लोक युगंधरला देव मानतात.  प्रेक्षकांना ही मालिका अन् माझी भूमिका नक्की आवडेल', असं अभिनेता म्हणाला.

 

या मालिकेविषयी बोलताना अरुण नलावडे म्हणाले, 'मला मिळालेली भूमिका खूप वेगळी आहे. पालकांचं छत्र गमावलेल्या 3 नातींच्या आजोबांची भूमिका मी साकारतो आहे.   तिन्ही नाती स्वभावाने गोड आहेत.  माझा स्वभाव मितभाषी आहे. तिन्ही अभिनेत्रींसोबत माझी गट्टी जमली आहे.  त्या सर्वांसोबत खूप आदराने वागतात.  त्यांची सतत काहीतरी शिकायची धडपड असते. मी देखील त्यांच्यासोबत शिकण्याचा प्रयत्न करतो आहे.  स्टार प्रवाह वाहिनी या मालिकेची गोष्ट खूप छान पद्धतीनं पुढे नेईल, यात शंका नाही', असं अभिनेता म्हणाला. 

आनंदी ही मालिका 30 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.