SS Rajamouli Trouble After Comment About Lord Hanuman: फिल्म इंडस्ट्रीचे (Film Industry) दिग्गज दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajamouli) भगवान हनुमानावर (Lord Hanuman) केलेल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. एसएस राजामौलींविरोधात हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष (National President of Hindu Sena) विष्णू गुप्ता यांनी त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत असं म्हटलंय की, राजामौली यांनी भगवान हनुमानाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली, ज्यामुळे हिंदू समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या. दरम्यान, 17 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये एसएस राजामौली यांच्या 'वाराणसी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान ही घटना घडली.

Continues below advertisement

भगवान हनुमानावर काय म्हणाले राजामौली? 

'वाराणसी' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान तांत्रिक बिघाड झाला. त्यावेळी या गोंधळावर राजमौली म्हणाले की, "माझा देवावर फारसा विश्वास नाही. हा माझ्यासाठी एक भावनिक क्षण... माझे वडील आले आणि म्हणाले की, हनुमान माझ्यासाठी सर्व गोष्टी सांभाळून घेतील. पण ही गडबड झाल्यावर मला त्यांच्यावर राग आला. मी त्यांना म्हणालो, 'हनुमान अशा पद्धतीनं मार्गदर्शन करतात का?"

"माझी पत्नी हनुमानाची खूप मोठी भक्त आहे. ती त्यांच्याशी आपल्या मित्राशी बोलल्यासारखी बोलते. तांत्रिक बिघाड झाल्यावर मी तिच्यावरही राग व्यक्त केला आणि विचारले, 'हनुमान असे वागतात का?", असं राजामौली पुढे बोलताना म्हणाले. राजामौली यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय आणि त्यांच्यावर बरीच टीका झाली. लोकांनी त्यांच्या या वक्तव्याला धार्मिक भावनांचा अपमान आणि हनुमानाच्या श्रद्धेचा अपमान म्हटलंय.

Continues below advertisement

राजामौलींवर चोहीकडून टीकेची झोड

राजामौलींनी व्यक्त केलेल्या या भावनांमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाला. राजामौलींच्या या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत 'राष्ट्रीय वानर सेना' या संघटनेच्या सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली आहे. नेटिझन्सनी राजामौलींवर टीका करताना म्हटले, "तुम्ही नास्तिक असाल, पण आपल्या अपयशासाठी हनुमानाला दोष देणे अत्यंत लज्जास्पद आहे." तर एका युजरने, "तुम्ही रामायणावर आधारित चित्रपट बनवता, पण हनुमानाबद्दल असे बोलणे चुकीचे आहे. लोकांनीच तुम्हाला राजामौली बनवले आहे, त्यांच्या भावनांशी खेळू नका," असे सुनावले.

राजामौलींविरोधात गुन्हा दाखल 

हिंदू सेनेनं राजामौली यांच्या या वक्तव्याची गांभीर्यानं दखल घेतलीय. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिलंय की, "भगवान हनुमानावरील त्यांच्या भक्तीमुळे त्यांना दुखापत झाली आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांकडून चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले की, राजामौली यांच्या या वक्तव्यामुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत तर सामाजिक आणि सामुदायिक सलोखा बिघडू शकतो.

विष्णू गुप्ता यांनी पोलिसांना या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर नियम लागू करण्याचं आवाहन केलंय. बाहुबली आणि आरआरआर सारखे हिट चित्रपट देणारे राजामौली हे त्यांच्या चित्रपटाच्या सेटची भव्यता, दमदार स्क्रिप्ट, डोळे दिपवणारे सीन्स आणि मोठ्या प्रमाणात अॅक्शन सीन्ससाठी ओळखले जातात.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FIR Against Director Vikran Bhatt: 200 कोटींचं आमिष दाखवून 30 कोटी हडपले; बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीसह 8 जणांवर FIR, प्रकरण नेमकं काय?