Spirit First Look: नववर्षाची सुरुवात होताच चित्रपटसृष्टीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी चित्रपट स्पिरिटचं पहिलं पोस्टर रिलीज करत मेकर्सनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी चाहत्यांना सरप्राइज दिलं. प्रभास आणि तृप्ती डिमरी यांच्या दमदार आणि इंटेंस अंदाजातील लूकमुळे हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मध्यरात्री ठीक 12 वाजता स्पिरिटचं पोस्टर समोर आणण्यात आलं. विशेष म्हणजे याआधी वांगाच्या अॅनिमल चित्रपटाची पहिली घोषणा देखील नववर्षाच्या मध्यरात्रीच करण्यात आली होती. यावेळीही मेकर्सनी हीच परंपरा कायम ठेवत नव्या वर्षाचं स्वागत स्पिरिटच्या पहिल्या झलकसह केलं.
प्रभासचा बेफिकीर... रॉ लुक
पोस्टरमध्ये प्रभास पूर्णपणे वेगळ्या आणि इंटेन्स लूकमध्ये दिसतो. लांबसडक केस, दाट दाढी-मिशी आणि जखमांनी भरलेलं शरीर अशा अवस्थेत प्रभास कॅमेऱ्याकडे पाठ करून उभा आहे. त्याच्या खांदा, हात आणि पाठीवर पट्ट्या बांधलेल्या दिसतात, ज्यामुळे त्याची व्यक्तिरेखा हिंसक संघर्षातून गेलेली असल्याचा अंदाज बांधला जात आहे. शर्टलेस लूकमध्ये प्रभासच्या ओठांत सिगारेट असून हातात दारूचा ग्लास आहे, जो त्याच्या कॅरेक्टरचा रॉ आणि बेफिकीर स्वभाव दाखवतो.
प्रभासच्या अगदी जवळ उभी असलेली तृप्ती डिमरी साध्या आणि सौम्य रंगाच्या साडीत दिसते. ती शांत चेहऱ्याने प्रभासची सिगारेट पेटवत आहे. दोघांमधील हा क्षण शांत वाटत असला, तरी त्यामध्ये दडलेला तणाव आणि भावनिक गुंतागुंत स्पष्ट जाणवते. नैसर्गिक प्रकाश आणि खिडकीतून दिसणारी शहराची झलक या पोस्टरला अधिक आकर्षक रूप देते.
पोस्टर शेअर करताना मेकर्सनी, “तुम्ही आधी जे पाहिलं त्यावर प्रेम केलं, आता जे कधीच माहित नव्हतं त्यावर प्रेम करा,” असा संदेश दिला आहे. पोस्टर रिलीज होताच चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत स्पिरिटबाबतची उत्सुकता व्यक्त केली आहे. अनेकांनी या पोस्टरला नववर्षाची ‘परफेक्ट भेट’ असल्याचं म्हटलं आहे.
स्पिरिट चित्रपटात प्रभास आणि तृप्ती डिमरीसोबत विवेक ओबेरॉय, कांचना आणि प्रकाश राज यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रभास एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे, तर तृप्ती त्याच्या प्रेमिकेचा रोल साकारणार आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार असून, तो अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये रिलीज करण्याची तयारी मेकर्सची आहे.