नवी दिल्ली: अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही एकमेव बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिला 1996 मध्ये मायकल जॅक्सनच्या 'वर्ल्ड टूर' दरम्यान भारतात आल्यावर त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली होती. अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांनी 1996 मध्ये मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत मायकल जॅक्सनचे भव्य स्वागत केले होते. यावेळी भारतील वेशात साडी परिधान करून सोनाली बेंद्रेने भारतीय रीतिरिवाजांनुसार मुंबई विमानतळावर जॅक्सनचे तिलक लावून आणि आरती करून स्वागत केले होते. आता सोनाली बेंद्रेने जवळजवळ २९ वर्षांनंतर त्या ऐतिहासिक क्षणामागील घटना उघड केल्या आहेत. 'सरफरोश' चित्रपटातील अभिनेत्रीने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सनच्या स्वागत समारंभासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता.

जेव्हा राज ठाकरेंच्या पत्नीने सोनालीला संपर्क साधलेला

सोनाली बेंद्रेने तेव्हाचा किस्सा सांगितला, ती म्हणाली, 'राज ठाकरेंच्या पत्नीने मला फोन केला त्यांनी मला सांगितले की, तुला यावेच लागेल आणि हे करावेच लागेल. मला वाटते की त्या राजची पत्नी शर्मिला होत्या.' शर्मिलांची आई आणि माझी मावशी बऱ्याच काळापासून मैत्रिणी आहेत आणि त्या म्हणाल्या, 'तू मायकल जॅक्सनचे स्वागत का करत नाहीस?' त्यावेळी ती तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर होती, त्यामुळे तिला मनवणे इतके सोपे नव्हते. तिने विमानतळावर जॅक्सनचे स्वागत करण्यासाठी होकार दिला, पण तिची अटही मांडली होते.

'विशेष अटीवर' मायकल जॅक्सनचे स्वागत केलं

सोनाली पुढे म्हणाली, 'मी म्हणाली, ठीक आहे, पण मग शोसाठीची तिकिटे हवी आहेत अशी अट घातली. म्हणून मी मायकल जॅक्सन यांचे स्वागत केले, कारण मला ही तिकिटे हवी होती जिथे मी माझ्या मैत्रिणी, मित्रांना घेऊन जाऊन शो पाहू शकेन', माझी बहीण, बहिणीच्या मैत्रिणी आणि सगळे गेलो होतो. आमच्याकडे बसण्याची व्यवस्था खूप छान होती, म्हणूनच मी ते करायला खूप उत्सुक होते.

सोनाली बेंद्रेने अनेक हिट चित्रपटांमध्ये केले काम

मायकल जॅक्सनने त्याच्या 'हिस्टोरी वर्ल्ड टूर'मध्ये अनेक देशांना भेट दिली आणि लाखो चाहत्यांसमोर सादरीकरण केले. मुंबईतील जॅक्सनचा संगीत कार्यक्रम हा या टूरचे खास वैशिष्ट आहे. त्यावेळी सोनाली बेंद्रे बॉलिवूडमधला यशस्वी टप्पा एन्जॉय करत होती. सोनालीने 1996 मध्ये 'दिलजले', 'सपूत' आणि 'रक्षक' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केले. सोनाली बेंद्रेने 'आग', 'सरफरोश', 'कीमत', 'हम साथ साथ हैं', 'इंद्र', 'कल हो ना हो' सारखे हिट चित्रपटही केले आहेत.