Sidhu Moose wala Birthday: प्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose wala) यांचा आज वाढदिवस आहे. आजचा दिवस तसा आनंदाचा, पण हा दिवस त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तसेच, त्यांच्या सर्व प्रियजनांसाठी खूप दुःखाचा आहे. कारण, गेल्या 29 मे रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायक सिद्धू मुसेवाला आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत.


सोशल मीडियावर त्यांचे चाहते आज त्यांना खूप मिस करत आहेत. 11 जून 1993 रोजी जन्मलेले शुभदीप सिंग सिद्धू उर्फ ​​सिद्धू मुसेवाला हे मानसा जिल्ह्यातील मुसेवाला गावचे रहिवासी होते. त्यांचे पूर्ण नाव शुभदीप सिंग सिद्धू होते. मुसा गावचे रहिवासी म्हणून त्यांना सिद्धू मुसेवाला म्हणून प्रसिद्धी मिळाली. सिद्धू मुसेवाला यांचे लाखो चाहते आहेत. सिद्धू मुसेवालांचे वडील भोला सिंह हे माजी लष्करी अधिकारी आहेत आणि आई चरण कौर या गावाच्या सरपंच आहेत. सिद्धूने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे.


गार्डियनच्या टॉप 50 यादीत सामील


सिद्धू मुसेवाला यांनी 'झी वेगन'मधून गायक म्हणून करिअरला सुरुवात केली होती. सिद्धू मुसेवाला यांना त्यांच्या गाण्यांमुळे खूप नाव आणि प्रेम मिळाले आहे. 2020 मध्ये, त्यांना गार्डियनच्या टॉप 50 नवीन कलाकारांमध्ये नामांकन मिळाले होते. सिद्धू मुसेवाला यांनी ‘निंजा परवाना’ हे गाणे लिहून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, ते या गाण्यामुळे अनेक वादात अडकले होते.


काँग्रेसने दिले निवडणुकीचे तिकीट


सिद्धू यांच्या 'संजू' गाण्यामुळे जुलै 2020 मध्ये वाद निर्माण झाला होता. एके-47 गोळीबार प्रकरणात सिद्धू मुसेवालाला जामीन मिळाल्यानंतर हे गाणे रिलीज झाले होते. सोशल मीडियावर रिलीज झालेल्या गाण्यात त्यांनी स्वत:ची तुलना अभिनेता संजय दत्तशी केली होती. यानंतरही त्यांची अनेक गाणी वादात अडकली होती. मात्र तरीही ते चाहत्यांचे लाडके होते. 2022 मध्ये काँग्रेसने मनसा येथील विद्यमान आमदार नजरसिंह मनशाहिया यांचे तिकीट कापून सिद्धू मुसेवाला यांना दिले होते. मात्र, निवडणुकीत मुसेवाला यांचा पराभव झाला होता.


हत्या प्रकरणाचा तपास सुरु


गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि अद्याप या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुसवाला यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या एका शूटरला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आठ शूटर्सपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. उर्वरितांचा शोध आता सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या