Siddharth Jadhav Wife Trupti Akkalwar: मराठी एकांकीका, नाटकांपासून अगदी थेट मराठी सिनेसृष्टी आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवणारा मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आपल्या हटके अभिनयासाठी ओळखला जातो. सिद्धार्थ जाधव त्या प्रोफेशनल लाईफसोबत त्याच्या पर्सनल लाईफसाठीही चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ जाधवच्या सुखी संसारात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. सुपरस्टार सिद्धार्थ जाधव आपल्या बायकोपासून विभक्त होणार असून दोघांचाही लवकरच घटस्फोट होणार असल्याचं बोललं जात होतं. याला कारण होतं, सिद्धार्थची बायको तृप्ती हिनं तिच्या सोशल मिडिया हँडल्सवरुन 'जाधव' आडनाव हटवून माहेरचं 'अक्कलवार' आडनाव लावल्याचं. अशातच आता सिद्धार्थ जाधवची पत्नी तृप्ती हिनं स्वतः 'तृप्ती अक्कलवार' असं नाव लावण्यामागचं कारण सांगितलं आहे. कांचन अधिकारी यांच्या 'बातो बातो में' या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत तृप्तीनं स्वतः माहेरचं आडनाव लावण्यामागचं कारण सांगितलं आहे. 

Continues below advertisement


मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव याची पत्नी तृप्तीनं एका मुलाखतीत बोलताना याचा उलगडा केला आहे. तृप्ती मुलाखतीत बोलताना म्हणाली की, "मी एक गोष्ट सांगते. 2013 मध्ये मी नोकरीतून ब्रेक घेतला. प्रत्येक मुलीला घर, चूलमूल या गोष्टी चुकलेल्या नाहीत. त्यानंतर मी सिद्धार्थच्या डेट्स, त्याचं कामकाज याकडे एक मॅनेजर म्हणून लक्ष घातलं. हळुहळू पैसे साठवून आम्ही वन बीएचके घर घेतलं. त्यानंतर 2 बीएचके घर घेतलं. एकंदर आम्ही आयुष्यात एकत्र पुढे आलो."






"तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात..."


"2020 मध्ये लॉकडाऊन सुरू होतं. आता नवरा-बायकोमध्ये छोटी-मोठी भांडणं होत राहतात. त्यात सिद्धू मला बोलता-बोलता बोलून गेला की, 'तुला कोण ओळखतं? तुला सगळे माझ्यामुळे ओळखतात. तुझी काय ओळख आहे? सगळे तुला सिद्धार्थ जाधवची बायको म्हणून ओळखतात…' माझ्या मनाला ती गोष्ट खूप लागली. त्याच्या आज हे लक्षातही नसेल. त्यानंतर मी बसले, खूप विचार केला. घर सांभाळणं हे माझं कामच आहे पण, जेव्हा एखाद्या बाईच्या ओळखीचा प्रश्न येतो, तेव्हा स्वत:चं काहीतरी करावं लागतं. मग, मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण, सिद्धू व्यग्र होता, त्यामुळे आपण मुलींना वेळ देऊ शकू की नाही हा प्रश्न होता. जर्नलिझममध्ये पुन्हा 12 तास काम करणं मला जमेल की नाही? अशा अनेक गोष्टींचा विचार मी करत होते.", असं तृप्ती म्हणाली. 


तृप्ती म्हणाली की, "19-20 व्या वर्षी मला बिझनेसवुमन व्हायची इच्छा होती. ती इच्छा मग त्या क्षणाला जागृत झाली. पण, आता शून्यातून सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्यासमोर उभा होता. बिझनेससाठी जवळपास 50 लाखांची गुंतवणूक करायची होती. आज कोणी विश्वास नाही ठेवणार पण, मी सिद्धूला यातलं काहीच सांगितलं नाही. कारण, मला त्याच्याकडून पैसे घ्यायचे नव्हते. मैत्रिणीच्या साथीनं मी स्टार्टअप सुरू केला. तेव्हा मी एक गोष्ट ठरवली होती की, आयुष्यात नाव लावायचं ते फक्त 'तृप्ती अक्कलवार' असं नाव लावायचं. कारण, आपली ओळख आपण विसरून जातो… त्यामुळे सगळ्या बिझनेसमध्ये मी माझं 'तृप्ती अक्कलवार' असं नाव लावलं. मी सिद्धार्थची बायको आहे, मी खोडू शकत नाही. मी इतकंही बोलेन की, सिद्धू सहज बोलून गेला पण, ती स्वत:ची ओळख निर्माण करण्याची मला प्रचंड गरज होती."


"स्वैरा एंटरप्राइजेस’ नावाने मी स्वत:ची कंपनी सुरू केली, त्यात साड्यांचा ब्रँड सुरू केला, दादरमध्ये मी प्रदर्शनं सुरू केली… 'स्वैरा एंटरप्राइजेस' अंतर्गत मी बनारसी साडी, दुप्पटे विकले. सलोन सुरू केलं. यानंतर 2025 मध्ये अलिबागला नागाव बीच आहे, तिथे मी स्वत:चं होमस्टे सुरू केलं. तृप्ती कॉटेज असं त्याचं नाव आहे. हे कॉटेज सुरू केल्यावर सिद्धूनं सुद्धा माझं कौतुक केलं होतं.", असं तृप्ती अक्कलवारनं यावेळी सांगितलं.


दरम्यान, तृप्तीच्या या मुलाखतीची झलक सिद्धार्थ जाधवनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर करत आपल्या बायकोचा उल्लेख 'स्ट्राँगवुमन' असा केला आणि तिचं भरभरून कौतुकही केलं. सिद्धार्थनं मे 2007 मध्ये तृप्ती अक्कलवारशी प्रेमविवाह केला. जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यावर ही जोडी लग्नबंधनात अडकली होती. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kunal Kamra Triggers Row Sings Song: कुणाल कामराच्या स्टँडअप स्किटमधील कोणत्या चार ओळी शिवसैनिकांना जास्त झोंबल्या? वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी VIDEO